उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पाणी पातळी वाढल्याने अनेकजण वाहून गेल्याची भीती
पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासन घटनास्थळी पोहोचलं असून मदत व बचावकार्य सुरू झालं आहे.
जोशीमठ : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्याची घटना घडली आहे. जोशीमठच्या रेणीतील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर कोसळल्याची माहिती आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासन घटनास्थळी पोहोचलं असून मदत व बचावकार्य सुरू झालं आहे.
तपोवन परिसरातील रेणी गावात वीज प्रकल्पाजवळ अचानक झालेल्या हिमस्खलनानंतर धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. चामोली जिल्हाधिकाऱ्यांनी धौलीगंगा नदीच्या काठी वसलेल्या गावातील लोकांना बाहेर काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी व पोलिस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले आहेत.
#WATCH | Water level in Dhauliganga river rises suddenly following avalanche near a power project at Raini village in Tapovan area of Chamoli district. #Uttarakhand pic.twitter.com/syiokujhns
— ANI (@ANI) February 7, 2021
जोशीमठपासून 25 कि.मी. अंतरावर पांग गावात एक प्रचंड हिमनग कोसळला. त्यामुळे धौली नदीला पूर आला. यानंतर हिमस्खलन झाले आणि नदीच्या पुरामुळे ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले. काही पूलांचे देखील यामुळे नुकसाना झालं आहे. एनटीपीसीच्या निर्माणाधीन तपोवन जलविद्युत प्रकल्पातील धरणाच्या काही भागाचंही नुकसान झालं आहे. धौली नदीच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क करण्यात आलं असून तेथून दूर जाण्यास सांगितले जात आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत म्हणाले की, चामोली जिल्ह्यात आपत्तीची घटना समोर आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना या परिस्थितीला सामोरे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करा. सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे.
आयटीबीपीने एक निवेदन जारी केले की, रेणी गावाजवळील धौलीगंगा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.पाणी पातळी वाढल्याने अनेक नदीकाठची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आयटीबीपीचे शेकडो कर्मचारी बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
चामोली पोलिसांनी सांगितले की, तपोवन परिसरातील हिमकडा तुटल्यामुळे ऋषीगंगा वीज प्रकल्प दुर्घटनाग्रस्त झाला आहे. धौलीगंगा नदीकाठी राहणाऱ्या लोकांना शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जातो आहे.