Ajit Doval : ट्रम्प टॅरिफ बॉम्बवर चीनच्या मैत्रीचा उतारा; चीनचे परराष्ट्रमंत्री अन् अजित डोवाल भेट फिक्स
Chine Wang Yi India Visit : अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचे चित्र बदलताना दिसत आहे. चीन-रशिया आणि भारत हे तीन मोठे देश एकमेकांच्या जवळ येत आहेत.

नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय कूटनीतीत नवा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चीनने भारताशी संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली असून, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्याशी चर्चा करणार आहेत.
भारत-चीन जवळीक
चीन आणि भारतासारख्या दोन मोठ्या शक्तींचे एकत्र येणे हे अमेरिकेसाठी धोरणात्मक चिंतेचे कारण मानले जात आहे. ट्रम्प प्रशासन भारतावर रशियाकडून कच्चे तेल खरेदी थांबवण्याचा दबाव टाकत आहे. मात्र, भारताने स्पष्ट केले आहे की आपले ऊर्जा-हित सांभाळूनच धोरण आखले जाईल. दरम्यान, अमेरिका पाकिस्तानसोबत जवळीक वाढवत असल्याच्या हालचाली दिसत आहेत.
रशिया आणि चीनशी भारताचे वाढते संबंध
वांग यी यांचा दौरा सुरू होण्याआधीच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर 21 ऑगस्ट रोजी रशिया भेटीवर जाणार आहेत. गेल्या आठवड्यात अजित डोभाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी भेट घेऊन सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि आगामी नेतृत्वस्तरीय बैठकींची तयारी यावर चर्चा केली होती. डोभाल यांनी संकेत दिला आहे की पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येतील.
पंतप्रधान मोदी SCO परिषदेसाठी चीनला जाणार
भारत-चीन संबंध 2020 मधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर ताणलेले होते. तथापि, आता दोन्ही देश पुन्हा संवादाच्या मार्गावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेच्या व्यासपीठावर रशिया आणि चीन दोन्ही देश उपस्थित राहतील.
ट्रम्प टॅरिफचा आर्थिक परिणाम
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ घोषणेमुळे भारताच्या निर्यात बाजारावर ताण वाढू शकतो. विशेषतः स्टील, अॅल्युमिनियम आणि टेक्सटाईलसारख्या क्षेत्रांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा वेळी चीनसारख्या मोठ्या बाजारपेठेशी संबंध सुधारणे भारतासाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.
ट्रम्प यांचा तऱ्हेवाईकपणा सांभाळणं आणि दुसरीकडं आपल्या जुन्या मित्रांसोबतचे संबंध वाढवणं हे भारतासमोरचं आव्हान असणार आहे. एकीकडं स्वदेशीचा नारा देत दुसरीकडं नवे व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची दुहेरी पावलं सध्या भारताकडून उचलली जात असल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा:























