(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NDA Exam Result 2021 : शाब्बास पोरींनो! एक हजार मुली NDAची परीक्षा पास, आता कठोर चाचण्या मग निवड...
एनडीएमध्ये ( NDA) प्रवेशासाठी मुलींचा मार्ग मोकळा झाल्यानंतर पहिल्याच संधीमध्ये मुलींनी आपली क्षमता सिद्ध केली. 14 नोव्हेंबरला झालेल्या सीडीएसई लेखी परीक्षेत तब्बल 1 हजार 2 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
नवी दिल्ली : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये ( NDA) प्रवेशासाठी मुलींचा मार्ग मोकळा झाल्यानंतर पहिल्याच संधीमध्ये मुलींनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. 14 नोव्हेंबरला झालेल्या सी डी एस ई लेखी परीक्षेत तब्बल 1 हजार 2 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. या सर्व मुलींच्या आता बौद्धिक, शारीरीक आणि मानसिक क्षमतेच्या चाचण्या होतील आणि या कठोर चाचण्यांमधून केवळ 19 जणींना एनडीएमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
देशभरातून 1 लाख 77 हजार 654 मुलींनी ही लेखी परीक्षा दिली होती. आजवर महिला अधिकाऱ्यांना चेन्नईमधील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून प्रशिक्षण घेता येत असे मात्र आता एनडीएचाही मार्ग मोकळा झालाय आणि त्या संधीचं मुली सोनं करताना दिसतायत
राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अजय भट्ट यांनी सांगितलं की, 14 नोव्हेंबरला ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार या परीक्षेला 5,75,856 एवढे विद्यार्थी बसले होते त्यापैकी 1,77,654 एवढ्या मुली होत्या. एनडीए उत्तीर्ण केलेल्या मुलींची SSB मुलाखत आणि वैद्यकीय चाचण्या होणार आहेत. या 1002 मुलींपैकी 19 जणींची निवड केली जाईल.
एनडीएमध्ये (NDA) महिलांची पहिली बॅच 2023 पासून सुरु होणार आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात याबाबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारनं ही बाब स्पष्ट केली होती. 2022 म्हणजे पुढच्या वर्षी मे पर्यंत एनडीएच्या प्रवेश परीक्षेत महिलांनाही संधी देणारी सर्व प्रक्रिया पूर्ण होईल असं केंद्र सरकारनं म्हटलं होतं. त्यानुसार सध्या प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. एनडीएची परीक्षा वर्षातून दोन वेळा होते.
18 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टानं यासंदर्भात दिलेल्या एका निकालानंतर महिलांना एनडीएचे दरवाजे खुले झाले होते. एनडीएमध्ये महिलांना प्रवेश नाकारणं ही लिंगभेद करणारी गोष्ट आहे असं सांगत कोर्टानं हा ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं तयारीसाठी किमान या वर्षाची सवलत मिळावी अशी विनंती केली होती.