मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय! यूपीत रस्त्यावर नमाज पठण होणार नाही, धार्मिक स्थळांवरील हजारो लाऊडस्पीकरही काढले
Uttar Pradesh Yogi Adityanath News : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या आदेशानंतर मंदीर असो किंवा मस्जिद त्यावर असलेले अवौध लाउडस्पीकर काढण्याचं काम सुरू केलं आहे.
Uttar Pradesh Yogi Adityanath News : उत्तर प्रदेशात आता रस्त्यावर नमाज पठण होणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निर्देश दिल्यानंतर आता राज्यातल्या प्रशासनानं त्याची अंमलबजावणी सुरु केलीय. उत्तर प्रदेशात शांतता कमिटीच्या बैठका घेऊन रस्त्यावरील नमाज पठण आणि धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर याबाबत अंमलबजावणी करण्याच्या निर्देशांची माहिती दिली जात आहे. एटामध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत प्रशासनानं भूमिका स्पष्ट केली. धार्मिक स्थळांवरील अनधिकृत लाऊडस्पीकर काढण्यात आलेत. आणि जे अजूनही असतील त्यांना नोटीस देऊन काढण्यात येतील असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. कोणत्याही धर्माच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमामुळे सार्वजनिक ठिकाणी बाधा येणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं प्रशासनाकडून शांतता कमिटीच्या बैठकीत सांगण्यात आलं. नियम न पाळणारांविरोधात कारवाई होणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशात मात्र योगींनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या आदेशानंतर मंदीर असो किंवा मस्जिद त्यावर असलेले अवौध लाउडस्पीकर काढण्याचं काम सुरू केलं आहे. स्वत: ज्या गोरखनाथ मंदिरचे ते महंत आहेत. त्या मंदिरातले आणि जवळच असलेल्या मस्जिदचे लाउडस्पीकरचा आवाज मर्यादित केला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये लाऊडस्पीकरवरून होणारं राजकारण पाहता यूपीत अनेक लाऊडस्पीकरच्या आवाजाविरोधात उचलेलं पाऊल कौतुकास्पद मानलं जात आहे. आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लाऊडस्पीकर हटवण्यात आले असल्याची माहिती आहे.
सद्गुरू परमहंसाचार्य यांना ताजमहालमध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्यानं नवा वाद
योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात सद्गुरू परमहंसाचार्य यांना ताजमहालमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झाला. अयोध्येतून आग्र्याला ताजमहाल पाहण्यासाठी गेल्यानंतर भगवे कपडे घातल्यानं आपल्याला रोखण्यात आल्याचा दावा जगद्गुरू परमहंसाचार्य यांनी केला. तिकिट दुसऱ्यांना विकून पैसे परत केल्याचंही परमहंसाचार्य यांनी म्हटलंय. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनावर त्यांनी आक्षेप घेतला. पण परमहंसाचार्य यांनी केलेले हे आरोप पुरातत्व अधिकाऱ्यांनी फेटाळले. सद्गुरु परमहंसाचार्य यांना भगवे कपडे घातल्यानं नव्हे तर धर्मदंड असल्यानं रोखण्यात आलं, असं स्पष्टीकरण पुरातत्व विभागाच्या अधीक्षकांनी दिलाय. या सगळ्या घटनाक्रमानंतर पुरातत्व विभागाचे अधीक्षक आर. के. पटेल यांनी परमहंसाचार्यांची माफी मागितली आहे.