Uttar Pradesh: गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशात मॉब लिंचिंगमची बरीच प्रकरणे घडल्याचे समोर आले आहे. अशातच अलीकडेच यूपीच्या कुशीनगरमध्ये एका मुस्लिम तरुणाला मॉब लिंचिंगमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. या तरुणाच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. यूपी निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर मुस्लिम तरुण बाबर अलीने कुशीनगरमध्ये आनंदोत्सव साजरा करताना मिठाई वाटली. त्यानंतर त्याच्याच समुदायाच्या लोकांनी त्याची हत्या केली, असं बोललं जात आहे.
काय आहे प्रकरण?
कुशीनगरमधील रामकोला येथील काठघरी गावात 20 मार्च रोजी निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर मिठाई वाटून जल्लोष करत असताना बाबर अली (25) या मुस्लिम तरुणाला त्याच्याच समाजातील शेजाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर 25 मार्च रोजी लखनौमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रविवारी मृतदेह गावात पोहोचल्यावर त्याच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार देत, आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यानंतर कुशीनगरमधील भाजपचे नवनिर्वाचित आमदार पीएन पाठक आणि इतर अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी बाबर अली याच्या कुटुंबीयांना समजावून सांगितले. त्यानंतर त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे मान्य केले.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची पत्नी फातिमा खातून यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 21 मार्च रोजी अजीमुल्ला, आरिफ, सलमा आणि ताहिद या चार जणांविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी यातील दोन आरोपी आरिफ आणि ताहिद यांना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: