Padma Awards 2022:  राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी सोमवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री 2022 पुरस्कार प्रदान केले. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे दिग्गज नेते कल्याण सिंह (मरणोत्तर श्रेणी) यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.



अभिनेते व्हिक्टर बॅनर्जी, ओडिया लेखिका डॉ. प्रतिभा रे, प्रसिद्ध विद्वान आचार्य वशिष्ठ त्रिपाठी, आणि भारत बायोटेकचे संस्थापक डॉ. कृष्णा एला व पत्नी सुचित्रा एला यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण, गायक सोनू निगम यांचा पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश होता. श्रीगुरु डॉ बालाजी तांबे यांनाही  औषधी क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री (मरणोत्तर) पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रसिद्ध गमका गायक एच आर केशवमूर्ती यांनाही पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने जानेवारी महिन्यात केली होती.



 






 







 


21 मार्च रोजी झालेल्या समारंभात राष्ट्रपतींनी दोन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि 54 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते. पद्मविभूषण प्राप्तकर्त्यांमध्ये - गीता प्रेसचे माजी अध्यक्ष राधे श्याम आणि दिवंगत CDS जनरल बिपिन रावत (दोघेही मरणोत्तर श्रेणीतील) यांचा समावेश होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, पॅरालिम्पिक भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया, संगीतकार रशीद खान, माजी केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला आदींना ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळाला होता.


देशातील सर्वोच्च नागरी सन्मान


‘पद्म पुरस्कार’ हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या अनेक विषयांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. यंदाच्या पद्म यादीत चार पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री प्राप्तकर्त्यांचा समावेश आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha