West Bengal: पश्चिम बंगाल विधानसभेसाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आमदारांनी भांडणामध्ये एकमेकांचे कपडे फाडले आणि धक्काबुक्कीही केली. यात काही आमदार जखमी झाले आहेत. या गदारोळानंतर भाजपच्या पाच आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बीरभूम हिसांचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केल्यावर तृणमूल काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले यानंतर भाजप आणि टीएसमी आमदारांमध्ये भांडण झाले, असा आरोप भाजपने केला आहे. या संपूर्ण घटनेनंतर विरोधी पक्षनेते आणि निलंबित आमदारांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली आहे.


पश्चिम बंगालच्या राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजप नेते शुभेंदू अधिकारी म्हणाले की, आज 4 निलंबित आमदारांनी राज्यपालांना विधानसभेत दिवसभर काय घडले, याची माहिती दिली. आम्ही त्यांना यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. त्यावर त्यांनी यावर विचार करू, असे आश्वासन त्यांनी दिले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी बंगालमधील भाजप खासदारांची भेट घेणार आहेत. सकाळी साडेआठ वाजता खासदारांसोबत नाश्त्यानंतर ही बैठक होणार आहे. ही बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणार आहे. यासोबतच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.



विधानसभेत गदारोळ झाल्याचे फोटो भाजपने प्रसिद्ध केले आहेत. नागरी वेशातील पोलिसांनी महिला आमदारांशी गैरवर्तन केले आणि आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप आमदार शुभेंद अधिकारी यांनी केला. या गदारोळानंतर शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या 5 आमदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. गोंधळ घालणाऱ्या आमदारांना सदनाबाहेर पाठवल्यानंतर बाहेरही गोंधळ सुरू झाला. निलंबनाची कारवाई केल्याने संतप्त झालेल्या भाजप आमदारांनी विधानसभेबाहेर निदर्शने करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.


दरम्यान, 21 मार्च रोजी बीरभूमच्या रामपूरहाटमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर संतप्त जमावाने 10 घरे जाळली. ज्यात महिला आणि मुलांसह आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयने आज या संपूर्ण प्रकरणात मृतांच्या नातेवाईकांसह आणखी काही लोकांना चौकशीसाठी बोलावले आहे. सीबीआय या संपूर्ण घटनेचा अहवाल 7 एप्रिल रोजी न्यायालयात सादर करणार आहे.