Bharat Bandh Today: कामगार कायद्यातील बदल आणि केंद्राच्या खाजगीकरणाच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज कामगार संघटनांनी दोन दिवसीय देशव्यापी संप (भारत बंद) पुकारला आहे. हा संप 28 आणि 29 मार्च असे दोन दिवस सुरु राहणार आहे. याचाच परिणाम बँका आणि अनेक औद्योगिक क्षेत्रात दिसून आला. याचा सर्वाधिक परिणाम पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये दिसून येत आहे. बंगालमधील संपाच्या पार्श्वभूमीवर डाव्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यानी कोलकात्याच्या जादवपूर रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने एकत्र येऊन रेल्वे ट्रॅक अडवले. यातच आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे विविध कामगार संघटना आणि डाव्या संघटनांच्या सदस्यांनी पीएसयू बँकांच्या खाजगीकरणासाठी रास्ता रोखो केला.
चेन्नईत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले
भारत बंदचा परिणाम देशाच्या संसदेबाहेरही दिसून आला. आज संसदेच्या कामकाजादरम्यान डाव्या आणि द्रमुक पक्षाच्या खासदारांनी दोन दिवसांच्या 'भारत बंद'ला पाठिंबा दिला आणि गांधी पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरोधात निषेध नोंदवला. तसेच चेन्नईत आज कामगार संघटनांनी रस्ते अडवले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.
उत्तर प्रदेशमध्ये वीज कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप
केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील वीज कामगारांसह उत्तर प्रदेशमधील वीज कर्मचारी आज आणि उद्या संपावर जाणार आहेत. वीज कर्मचारी आणि अभियंत्यांच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या (NCCOEEE) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेत सहभागी असलेल्या ऑल इंडिया पॉवर इंजिनीअर्स फेडरेशनचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी सांगितले की, 'केंद्रीय कामगार संघटनांच्या भारत बंदच्या हाकेवर 28 आणि 29 मार्च रोजी देशातील सर्व राज्यातील सर्व वीज कामगारही संपात सहभागी होतील.'
भारत बंदला 'महाराष्ट्रात' कसा प्रतिसाद?
दोन दिवसांच्या भारत बंदला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. असं असलं तरी दोन दिवसाच्या या संपामुळे बँकिंगसह वाहतुकीसारख्या विविध सेवांना फटका बसणार आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने या संपाला पाठिंबा दिला आहे.
आर्थिक मागणीसाठी तर खाजगीकरणाच्या विरोधात संप : बँक कर्मचारी संघटना
आज संपाव्या दिवशी महाराष्ट्र राज्यातील बँक कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद, लातूर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे येथे प्रभावी निदर्शने केली व सरकारच्या बँक खाजगीकरण धोरणाच्या विरोधात आपला आवाज बुलंद केला. मुंबई शहरातील पाच हजारावर बँक कर्मचारी आझाद मैदानात जमा झाले होते. हा संप बँक कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही आर्थिक मागणीसाठी अथवा सेवाशर्तीतील सुधारासाठी नाही तर केवळ बँक खाजगीकरणाला विरोध या महत्त्वपूर्ण मागणीसाठी असल्याचं बँक कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केलं आहे.
7 हजार बँक शाखेतील 30 हजार कर्मचारी संपावर
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन सचिव देवीदास तुळजापूरकर यांनी प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, ' 7 हजार बँक शाखेतील 30 हजार कर्मचारी संपावर आहेत. आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील कर्मचारीही संपावर आहेत. कर्मचाऱ्यांचा बँक खाजगीकरणाला विरोध आहे. ठेवीची सुरक्षितता हवी असेल तर हे आंदोलन आवश्यक आहे.
भारत बंदमध्ये राज्यातील 65 टक्के वीज कर्मचारी सहभागी
भारत बंदमध्ये राज्यातील 65 टक्के वीज कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. केवळ 35 टक्केच कर्मचारी कामावर पोहोचले होते. मुख्य वीजप्रवाहात तांत्रिक सध्या सर्व यंत्रणा सुरळीत सुरू असल्यामुळे काही अडचण नाही. मात्र अडचण आली तर याचा राज्यभरातील जनतेवर मोठा परिणाम दिसणार आहे. वीज कर्मचारी संपावर गेले असतानाच उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा संप कर्मचाऱ्यांनी त्वरित मागे घ्यावा असे आवाहन केले आहे.