मोफत लस देतोय म्हणून पेट्रोल, डिझेल महागलं; केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांचं अजब वक्तव्य
Fuel Price Hike : मोफत लस देतोय म्हणून पेट्रोल, डिझेल महागलं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं खळबळ उडाली आहे.
Fuel Price Hike : केंद्र सरकारने देशभरातील कोट्यवधी नागरिकांना मोफत कोरोना लस दिली. त्यामुळेच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, अशी मुक्ताफळं केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी उधळली आहेत. हिमालयातील एक लिटर पाणी एक लिटर पेट्रोलपेक्षाही महाग आहे, असेही तेली म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांच्या या अजब वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी शंभरी गाठल्याने सर्वसामान्य नागरिक महागाईच्या वणव्यात होरपळत आहेत. त्यात आता केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री रामेश्वर तेली यांनी आपल्या विधानाने इंधन दरवाढीच्या आगीत तेल ओतले आहे. केंद्र सरकारने देशभरातील कोट्यवधी नागरिकांना मोफत कोरोना लस दिल्याने पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, अशी मुक्ताफळे तेली यांनी उधळली. हिमालयातील एक लिटर पाणी एक लिटर पेट्रोलपेक्षाही महाग आहे, असेही तेली म्हणाले आहेत.
पेट्रोल, डिझेल महाग नाहीय, केंद्र आणि राज्यांनी त्यावर कर लावला आहे. त्यातच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस केंद्राने मोफत दिली आहे. मग त्या लसींसाठी पैसे कुठून येणार? तुम्ही लसीसाठी पैसे दिले नाहीत. त्यामुळे करांमधून लसींची किंमत वसूल करण्यात आली आहे, असे अजब वक्तव्य करीत केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री तेली यांनी इंधन दरवाढीने होरपळणाऱ्या जनतेच्या जखमेवर मीठच चोळले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा देशात 'रेकॉर्ड ब्रेक'
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर स्थिर आहेत. ब्रेंट क्रूडने पुन्हा एकदा प्रति बॅरल 84 डॉलरची पातळी ओलांडली आहे. तर अमेरिकन बेंचमार्क क्रूड (Crude) 80 डॉलर्सच्या पार आहे. दरम्यान, आज (मंगळवारी) 12 ऑक्टोबर रोजी देशातील तेलाच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दरम्यान, गेले सात दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच होतं. आज किमती स्थिर असल्यानं काही अंशी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे.
भारतीय तेल कंपन्यांच्या वतीनं आज (12 ऑक्टोबर) रोजी जारी करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार, मंगळवारी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) चे दर स्थिर आहेत. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये आज दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दोन्हींचे दर (Fuel Price) वाढलेले नाहीत. यापूर्वी 4 ऑक्टोबर रोजी तेलाच्या किमती स्थिर होत्या.
इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 104.44 रुपये प्रति लिटर आहे, तर मुंबईत 110.41 रुपये प्रति लिटरच्या सर्वोच्च स्तरांवर आहे. तसेच मुंबईत डिझेल आता 101.03 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. तर दिल्लीत आज डिझेल 93.17 रुपयांवर स्थिर आहे. देशातील सर्व चार प्रमुख शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईबाबत बोलायचं झालं तर, पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) सर्वाधिक दर मुंबईत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :