(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकऱ्यांना दिलासा, केंद्राकडून खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ
भातवरील किमान आधारभूत किंमतीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर1868 रुपये प्रतिक्विंटलपासून भात आता प्रतिक्विंटल 1940 रुपये झाला आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पुन्हा एकदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, भातवरील किमान आधारभूत किंमतीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर1868 रुपये प्रतिक्विंटलपासून भात आता प्रतिक्विंटल 1940 रुपये झाला आहे. यासह बाजरीवरील किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 2150 रुपयांवरून 2250 रुपये प्रतिक्विंटलवर करण्यात आली आहे.
कृषीमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या 7 वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकेल यासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. किमान आधारभूत किंमत 2018 पासून किंमतीवर 50 टक्के परतावा जोडून घोषित केली जाते. चालू खरीप विपणन हंगामासाठी (KMS) 2020-21 (6 जून 2021 पर्यंत) गेल्या वर्षीच्या 736.36 LMT च्या तुलनेत किमान आधारभूत किंमतीवर LMT पेक्षा जास्त धान्य खरेदी केले गेले, ज्यामुळे शेतकर्यांना यांचा फायदा झाला आहे.
कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एकामागून एक कृषी क्षेत्रात मोठे निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. शेतीला फायदेशीर व्यवसाय करण्यासाठी काम केले गेले.
शेतकरी आंदोलनावर कृषीमंत्री म्हणाले की, देशातील सर्व पक्षांना कृषी कायदा आणायचा होता. परंतु त्यांची हिंमत होऊ शकली नाही. भारत सरकारने 11 वेळा शेतकऱ्यांशी संवाद साधला. परंतु कोणत्याही शेतकरी संघटनेने किंवा कोणत्याही पक्षाने यावर उत्तर दिले नाही. त्यामुळे चर्चा पुढे जाऊ शकली नाही. जेव्हा शेतकरी चर्चेसाठी तयार असतात, तेव्हा आम्ही चर्चेसाठी तयार असतो.
पीक आणि आधारभूत किंमत
धान्य (सामान्य)- 1940 रुपये (आधारभूत किमतीत वाढ- 72 रुपये)
धान्य (ग्रेड ए) - 1960 रुपये (आधारभूत किमतीत वाढ- 72 रुपये)
ज्वारी (हाईब्रिड)- 2738 रुपये (आधारभूत किमतीत वाढ- 118 रुपये)
ज्वारी (मालदांडी) - 2758 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ- 118 रुपये)
बाजरी - 2250 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ - 100 रुपये)
नाचणी - 3377 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ- 82 रुपये)
मका - 1870 रुपये (आधारभूत किमतीत वाढ -20 रुपये )
तूर - 6300 रुपये - ( आधारभूत किमतीत वाढ- 300 रुपये)
उडीद - 7275 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ -79 रुपये )
भुईमूग - 5550 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ- 275 रुपये )
सूर्यफूल बियाणे - 6015 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ - 130 रुपये)
सोयाबीन - 3950 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ - 70 रुपये)
तीळ - 7307 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ - 452 रुपये)
कापूस (मध्यम रेशा) - 5726 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ - 211 रुपये)
कपास (लांब रेशा) - 5025 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ- 200 रुपये )