Bihar Bridge Collapsed: बिहारमध्ये गंगा नदीवर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला; पाहा व्हिडीओ
Bihar Bridge Collapsed: जवळपास 1700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेला पूल गंगा नदीत कोसळला.
Bihar Bridge Collapsed: बिहारमधील भागलपूरमध्ये (Bihar Bhagalpur) रविवारी एक बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवित झाली नाही. हा पूल कोसळल्याने घटनास्थळी आणि परिसरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
खगरिया-अगुवानी-सुलतानगंज दरम्यान बांधण्यात येत असलेला पूल कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पुलाची पडझड सुरू झाल्यानंतर अवघ्या काही वेळेतच संपूर्ण पूल गंगा नदीत कोसळला. आश्चर्याची बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वीही या पुलाचा काही भाग कोसळला होता. चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या पुलाची पायाभरणी केली होती. या पुलाच्या अपघाताने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तर, सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
1717 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिलमध्ये आलेल्या वादळामुळे या बांधकामाधीन पुलाचा काही भागही खराब झाला होता. खगरिया-अगुवानी-सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या महासेतूचा मधला भाग कोसळला. पुलाचा वरचा भाग नदीत कोसळला आहे.
बांधकामाधीन पुलाचा वरचा भाग कोसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र पूल कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खगरिया आणि भागलपूरला जोडण्यासाठी हा पूल उभारण्यात येत होता.
#Bihar a portion of under construction bridge over Ganga river collapsed today. The Aguanhighat Sultanganj bridge will connect Khagaria and Bhagalpur districts. pic.twitter.com/7DLTQszso7
— All India Radio News (@airnewsalerts) June 4, 2023
भागलपूरचे डीडीसी कुमार अनुराग यांनी म्हटले की, आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पूल कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित विभागाकडून याबाबतचा अहवाल मागितला असल्याचे त्यांनी म्हटले.
जेडीयूचे आमदार ललित मंडल म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या पुलाचे उद्घाटन होईल, अशी आमची अपेक्षा होती, मात्र असे अपघात घडत आहेत, हा तपासाचा विषय आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्याची चौकशी होईपर्यंत काहीही सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.