Ukraine Russia War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Pm Narendra Modi ) यांच्यात आज रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा झाली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात जवळपास 50 मिनिटे फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेत पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन आणि रशियादरम्यान सुरू असलेल्या चर्चेची माहिती दिली आहे. भारत सरकारच्या सूत्रांनी या चर्चेबाबत माहिती दिली आहे. 
 
भारत सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना  रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांमध्ये सुरू असलेल्या चर्चेव्यतिरिक्त थेट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत बोलण्याचे आवाहन केले. यासोबतच युक्रेनमधून नागरिकांना बाहेर पडण्यासाठी काही वेळ युद्धविराम घोषित केल्याबद्दल आणि सुमीसह युक्रेनच्या अनेक भागात मानवतावादी कॉरिडॉर तयार केल्याबद्दल नरेंद्र  मोदींनी रशियाचे कौतुक केले आहे.




पुतिन यांच्याशी चर्चा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमीमधून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या मुद्यावर भर दिला.पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत चचा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली होती. युद्धग्रस्त देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल झेलेन्स्की यांचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. झेलेन्स्की आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये जवळपास 35 मिनिटे चर्चा झाली आहे. 


रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 12 वा दिवस आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुन्हा एकदा जगातील इतर राष्ट्रांना या वादात न पडण्याची ताकीद दिली आहे. 'युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन'ची घोषणा करणारं कोणतंही राष्ट्र हे थेट रशिया-युक्रेन वादात पडल्याचं गृहीत धरु', असं पुतिन यांनी म्हटलं आहे.   


महत्वाच्या बातम्या