नवी दिल्ली: या वर्षीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहूणे असणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यापासून त्यांच्या भारत दौऱ्यावर आशंका व्यक्त केली जात होती.


या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताकडून ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली आणि भारतीय दौऱ्यावर येणं अशक्य असल्याचं सांगत खेद व्यक्त केला.


ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी देशातच राहण्याचा आणि आव्हानांचा सामना करण्याचा निर्णय घेतला आहे.


ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने त्या देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या स्ट्रेनचे संक्रमण वेगाने पसरत आहे. ब्रिटनची स्थिती ही अत्यंत चिंताजनक आहे आणि आरोग्य यंत्रणेवर प्रचंड दबाब आहे.


गेल्या एका आठवड्यात ब्रिटनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत एक तृतीयांशने वाढ होऊन ती जवळपास 27 हजार इतकी झाली आहे. ही संख्या एप्रिल महिन्यातील रुग्णसंख्येच्या 40 टक्के जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनने भारतातही शिरकाव केला असून भारतात आतापर्यंत 38 रुग्ण सापडले आहेत.


संबंधित बातम्या: