नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आला आहे. हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तिथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीचं लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आला असून तो नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा तिथल्या सरकारने दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी इंग्लंडमधून येणारी हवाई वाहतूक तातडीने स्थगित करण्याचं सुचवलं आहे. सोबतच आगामी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे पाहुणे असलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौराही रद्द करावा, असं म्हटलं आहे. 'एबीपी माझा'सोबत साधलेल्या संवादादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोना व्हायरससह काँग्रेसमधील काही नेत्यांनी सोनिया गांधींनी लिहिलेलं पत्र, काँग्रेसअंतर्गत निवडणुकीबाबत भाष्य केलं.
ब्रिटनमधून येणारी हवाई वाहतूक स्थगित करा : चव्हाण
कोरोना व्हायरसचा नवा समोर आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तिथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीचं लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे. यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनीही बैठकीचा घोळ न लावतात तातडीने हवाई वाहतूक स्थगित करावी असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, "युरोपमधल्या बहुतेक देशांनी इंग्लंडमधून येणाऱ्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत नव्या विषाणूचं स्वरुप आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपणही तातडीने हवाई वाहतूक स्थगित केली पाहिजे. तिथले आरोग्यमंत्री संसदेत म्हणत आहेत की हा विषाणू आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. आपण हे वक्तव्य गांभीर्याने घेतलं पाहिजे. बैठकीचा घोळ न लावता ही बंदी घातली पाहिजे. जे लोक आधी आले आहेत त्यांना क्वॉरन्टाईन केलं पाहिजे."
बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करा : पृथ्वीराज चव्हाण
भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे हे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आहेत. परंतु ब्रिटनमध्येच कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा, असं चव्हाणांनी सुचवलं आहे. ते म्हणाले की, "प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जनतेचं आरोग्य आहे, त्याच्याशी तडजोड नको."
'सोनियांनी आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा केली'
बिहार निवडणुकीच्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस पक्षात नेतृत्व आणि व्यापक संघटनात्मक बदल व्हावा यासाठी कॉंग्रेसच्या 23 नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर काही नेत्यांसोबत सोनिया गांधी यांनी चर्चाही केली. या बैठकीविषयी विचारलं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "पत्राद्वारे आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्याबद्दल बैठकीत चर्चा झाली. अत्यंत गांभीर्याने सोनियाजी यांनी या बैठकीत सर्वांचं म्हणणं ऐकलं.
लवकरच काँग्रेसअंतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम
काँग्रेसअंतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. ते म्हणाले की, "राहुल गांधी यांच्या पुनरागमनाबाबत मी काही बोलणार नाही. कोणीही लोकमान्य व्यक्ती असो ती पूर्णवेळ काम करणारी असली पाहिजे. निवडणुकीतून ती व्यक्ती नेमली तर अधिक चांगलं."
ते पुढे म्हणाले की, "गेल्या वीस एक वर्षांत कार्यकारिणीच्या निवडणुका थांबल्या आहेत. काँग्रेसमधलं पार्लमेंटरी बोर्ड अस्तित्वात नाही. पक्षाच्या घटनेत जी तरतूद आहे ती पुन्हा चालू केली पाहिजे. त्यातून दुय्यम प्रकारचे नेतृत्त्व पुढे येणं थांबेल."
"भाजपमध्ये हुकूमशाहीची प्रवृत्ती अंगभूत आहे. त्यांच्या कार्यशैलीत काँग्रेसने देशाला लोकशाही दिली आहे. अंतर्गत लोकशाही आणखी पुढे गेली पाहिजे यासाठी पक्षांतर्गत निवडणुकीचा आग्रह आहे. पक्षाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची लवकरच घोषणा होईल असं आम्हाला सांगितलं आहे."
संबंधित बातम्या
राहुल गांधींकडे अध्यक्षपदाची जबाबदारी द्या, बैठकीत नेत्यांची मागणी
Coronavirus | ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; भारतीय आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर, अनेक देशांच्या विमानसेवा स्थगित
Prithviraj Chavan | इंग्लंडमधून येणारी हवाई वाहतूक तातडीने थांबवली पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण