नवी दिल्ली : आयकर विभागाची टीम काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या घरी पोहोचली आहे. सोमवारी इन्कम टॅक्स पथकाने वाड्रा यांच्या सुखदेव विहार येथील कार्यालयात सलग 9 तास मुक्काम केला होता. बेनामी मालमत्ता विरोधी कायद्यांतर्गत त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे.


आयकर विभागाच्या चौकशीनंतर उद्योजक वाड्रा म्हणाले की, या चौकशीचे उद्दीष्ट हे शेतकरी चळवळीसारख्या देशाशी संबंधित खर्‍या प्रश्नांवरुन लक्ष हटवणे आहे.


राजस्थानमधील बिकानेर येथे वाड्रा यांच्याशी संबंधित कंपनीकडून काही भूखंड खरेदीसंदर्भात चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 2015 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणाबाबत मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.


याबाबत अंमलबजावणी संचालनालयाने वाड्रा यांची चौकशी केली असून 2019 मध्ये त्यांची कंपनी 'स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड'ची 4.62 कोटींची संपत्ती जप्त केली.


ब्रिटनमध्ये काही अघोषित उत्पन्न असल्याच्या आरोपाखाली इन्कम टॅक्स विभागाकडून वाड्रा यांचीही चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालय वाड्रा यांच्याविरूद्ध मनी लॉन्ड्रिंगविरोधी कायद्यांतर्गत या आरोपांचीही चौकशी करीत आहे.