औरंगाबाद : ब्रिटन, अमेरिका व युरोप खंडासारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. गेला आठवडाभर गाजत असलेला नवीन प्रजातीच्या कोरोनाच्या विषाणूचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. सर्वाधिक वेगाने संक्रमित होणाऱ्या या विषाणूच्या भारतातील प्रवेशामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. महाराष्ट्रात कुठेही नवीन विषाणूचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. ते औरंगाबाद येथे पत्रकार परीषदेत बोलत होते.
राजेश टोपे काय म्हणाले?
कोविड असलेले लोक व कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात ब्रिटनच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या रुग्णाची नोंद झाली नाही. 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेंनचा पॉझिटीव्ह रुग्ण नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, अशी ग्वाही राजेश टोपे यांनी दिली आहे.
हलगर्जीपणा झाला असेल तर जाब विचारू : टोपे
रुग्णांचे स्वॅब पाठवण्यास हलगर्जीपणा झाला असेल तर जाब विचारू. महाराष्ट्र पहिले राज्य आहे ज्यांनी UK मधील फ्लाईट्स थांबवल्या. सगळ्या प्रवाश्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करत आहोत. देश आणि राज्यात योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र, नागरिकांनीही सावध असणे आवश्यक आहे. नव्या कोरोनाचा संसर्गाचा वेग 70% जास्त आहे. त्यामुळे संसर्ग अधिक गतीने होऊ शकतो. ब्रिटन, अमेरिका व युरोप खंडासारखे कडक लॉकडाऊन होऊ नये असे वाटत असेल तर यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी.
लोकांनी नियम पाळणे गरजेचं : आरोग्यमंत्री
पर्यटन स्थळे उघडल्याने सगळीकडे गर्दी होत आहे. सार्वजनिक कार्यक्रम व लग्नाला देखील लोक गर्दी करत आहेत. त्यांनी मास्क व सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. जगात हाच महत्वाचा नियम असून नियमाने काम करणे या क्षणाला गरजेचे आहे.
नवीन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सज्ज
या नवीन विषाणूचा शिरकाव भारतात होऊ नये म्हणून केंद्र सरकारने तात्काळ पाऊले उचलून ब्रिटन होऊन येणाऱ्या विमानांना प्रवेश बंदी करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मात्र, बंदी करण्याच्या आदल्या दिवशी येणाऱ्या काही प्रवाशाच्या तपासणीत हा नवीन विषाणू 6 प्रवाशांच्या नमुने तपासणीत आढळून आला आहे. अजून काही नमुन्यांची तपासणी सुरूच आहे. सध्याच्या तपासणीत सध्या तरी महाराष्ट्रातील एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, भविष्यात महाराष्ट्रात मिळणारच नाही असे खात्रीलायक सांगता येत नाही. सध्या जे रुग्ण सापडले आहेत ते भारतातील विविध भागातील आहे. या नवीन विषाणूचा परदेशातील कहर पाहता हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कारण होता कामा नये. त्या दृष्टीने नागरिकांनी न घाबरता सुरक्षिततेच्या सर्व नियमाचे पालन करत आपला वावर ठेवला पाहिजे, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.
CoronaVirus | ब्रिटनच्या नव्या विषाणूचा भारतात शिरकाव! 6 भारतीयांना नव्या स्ट्रेनची लागण