देशावर तुकडे तुकडे गँगची सत्ता; तुषार गांधींचा मोदी-शाहांना टोला
CAA विरोधात आंदोलनं करणाऱ्या लोकांना काँग्रेसची तुकडे तुकडे गँग म्हणणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांना तुषार गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यापासून त्याविरोधात दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशाच्या अनेक भागांमध्ये आंदोलनं होत आहेत. देशभरातून केंद्र सरकारवर टीका सुरु आहे. आता त्यामध्ये महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांची भर पडली आहे. तुषार गांधी यांनी ट्वीट करुन केंद्र सरकारवरील नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, सध्या केंद्रात 'टुकडे-टुकडे गँग' सत्तेत आहे.
काल (26 डिसेंबर)दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीत जी आंदोलनं सुरु आहेत, त्यामागे काँग्रेस आहे. काँग्रसनेच लोकांची दिशाभूल केली आहे. लोकांची माथी भडकवून त्यांना आंदोलनं करण्यास प्रवृत्त केलं आहे.
शाह म्हणाले होते की, काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे-तुकडे गँग दिल्लीतली शांतता भंग करत आहे. दिल्लीच्या जनतेने या तुकडे-तुकडे गँग आणि काँग्रेसला धडा शिकवायला हवा. दिल्लीच्या जनतेने आगामी विधानसभा निवडणुकीत हे काम करायला हवे. शाह यांच्या याच वक्तव्याला आज तुषार गांधी यांनी उत्तर दिले आहे. तुषार गांधींनी मोदी-शाह यांच्यासह भारतीय जनता पक्षालाच तुकडे तुकडे गँग संबोधले आहे.
शाह म्हणाले होते की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा आम्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला होता. दोन्ही सभागृहात त्याविषयी चर्चा झाली. त्यावेळी काँग्रेस यावर काहीच बोलली नाही. आता मात्र हीच काँग्रेस या कायद्याविरोधाल लोकांना भडकावून हिंसाचार करायला लावत आहे. तुकडे तुकडे गँगला हाताशी धरुन हिंसक आंदोलनं करत आहे.
The Tukde Tukde Gang is currently in power at the Centre.
— Tushar (@TusharG) December 27, 2019