Yusuf Pathan : पाकिस्तानचा पर्दाफाश करणाऱ्या संसदीय पथकासोबत जाण्यास युसूफ पठाणचा नकार; समोर आलं मोठं कारण
केंद्र सरकारने तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचाही समावेश केला आहे, परंतु एका वृत्तानुसार, पठाण यांनी या पथकासोबत जाण्यास नकार दिला आहे.

Yusuf Pathan : पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारताने 33 देशांमध्ये खासदार आणि माजी राजदूतांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची सात गटामध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटासाठी एक लीडर देण्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांच्या नेत्यांनाही शिष्टमंडळात समाविष्ट करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण (Trinamool MP Yusuf Pathan) यांचाही समावेश केला आहे, परंतु एका वृत्तानुसार, पठाण यांनी या पथकासोबत जाण्यास नकार दिला आहे.
तृणमूल काँग्रेसने रविवारी केंद्र सरकारला सांगितले की युसूफ पठाण किंवा पक्षाचा कोणताही अन्य खासदार सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असणार नाही. हे शिष्टमंडळ दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी अनेक देशांमध्ये जाईल.
युसूफ पठाणच्या बाबतीत तृणमूल काँग्रेसने काय म्हटले?
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने म्हटले की, "आम्हाला वाटते की देश प्रथम येतो आणि देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली कोणतीही कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आमच्या सशस्त्र दलांनी देशाला अभिमानास्पद बनवले आहे आणि आम्ही नेहमीच त्यांचे ऋणी राहू. परराष्ट्र धोरण पूर्णपणे केंद्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात आहे. म्हणून, फक्त केंद्र सरकारलाच आमचे परराष्ट्र धोरण ठरवण्याची आणि त्याची संपूर्ण जबाबदारी घेण्याची परवानगी दिली पाहिजे."
भारताने पाकिस्तानचा पर्दाफाश करण्याची योजना आखली
सरकारने खासदारांच्या शिष्टमंडळात युसूफ पठाण यांचा समावेश केला होता. एका वृत्तानुसार, सरकारने पठाणशी थेट संपर्क साधला होता. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने आक्रमक भूमिका घेतली आणि अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जरी भारताने प्रत्येक हल्ला हाणून पाडला. आता भारत जगभरात शिष्टमंडळे पाठवण्याची तयारी करत आहे. ते जगाला पाकिस्तानबद्दलचे सत्य सांगेल.
इतर महत्वाच्या बातम्या
























