नवी दिल्ली: भारतीय लष्कराने सैन्यदलाच्या तीन डिव्हिजन लडाख सेक्टरकडे पाठवल्या आहेत. यामध्ये अनेक स्क्वाड्रन्स आणि रणगाडे असल्याचं सांगितलं जातंय. चीनने एलएसीच्या परिसरात पहिल्यापासून सैन्याची मोठी जमवाजमव केली असल्यामुळे भारतानेही आता त्याला उत्तर म्हणून या परिसरातील सैन्याची हालचाल वाढवली आहे.


हिंदुस्थान टाईम्स ऑनलाईन आवृत्तीत भारतीय लष्कराच्या हालचालीचं वृत्त प्रकाशित झालंय, पंधरा दिवसांपूर्वी चीनने केलेल्या आगळिकीमुळे तब्बल 20 भारतीय जवान शहीद झाले होते. आता चीनने कसलीही कुरापत काढू नये यासाठीच भारताने या परिसरातील सैन्याची उपस्थिती वाढवली आहे.

लडाख  परिसरात सध्या भारताची तीस हजार सैन्याची कुमक आहे. हे सर्व सैनिक हिमालयातील अत्युच्च ठिकाणी आणि ऑक्सिजन विरळ असलेल्या ठिकाणी तैनातीसाठी खास प्रशिक्षण दिलेलं आहे.

भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर वायुदलाची ताकद वाढणार; 6 राफेल विमानं लवकरच भारतात दाखल होणार

लडाखच्या परिसरातील भारतीय सैन्याची जमावाजमव ही लष्कराच्या राखीव कोट्यातील सैन्यातून करण्यात आली आहे. राखीव सैन्य दलातील जवान हे डोंगरदऱ्यातील तैनातीसाठी विशेष प्रशिक्षित असतात. विमाने आणि बसच्या माध्यमातून लडाखमध्ये ही सैन्यदलाची ही अतिरिक्त कुमक पाठवली जात आहे.

दरम्यान काल भारत आणि चीन यांच्यातील कमांडर स्तरावर तब्बल दहा तास चर्चा झाली. पूर्व लडाख आणि गलवान खोऱ्याच्या परिसरात यापुढे दोन्ही सैन्यांमध्ये हिंसक झटापटी होणार नाहीत, तसंच दोन्ही देशांच्या जवानांदरम्यान वारंवार शाब्दिक बाचाबाचीही होणार नाही, यासाठी करावयाच्या उपाय योजनांवर चर्चा होत आहे. तब्बल दहा तासांच्या चर्चेनंतरही अंतिम तोडगा निघू शकलेला नाही.

आता चीनकडूनही भारतीय निर्यातीच्या कस्टम क्लियरन्समध्ये अडथळे

या बैठकीत चीन वारंवार एलएसीबाबत नवनवे दावे करत आहे आणि कोणतीही एक सीमा निश्चित मानत नसल्याचं उघड झालंय. तसंच चीनी सैन्याने एलएसी परिसरात आणि गलवान खोऱ्यात वाढवलेली सैन्य कुमक मागे घ्यावी असा या कमांडर स्तरीय चर्चेत भारताचा आग्रह राहिलेला आहे.

भारत आणि चीन यांच्यात चर्चेतून तोडगा निघाला नाही तर एलएसीवरील सैन्य दलाची तैनाती सप्टेंबरपर्यंतही राहू शकते असं काही जाणकारांना वाटतं. सप्टेंबरनंतर या परिसरात वाढणाऱ्या थंडीमुळे दोन्ही देशांना सैन्य तैनातीवर फेरविचार करावा लागेल, असं जाणकारांना वाटतं.