मुंबई : मुंबईकरांनी आता पाणी जपून वापरण्याची गरज आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पुढचे फक्त 30 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. जून महिना सरत आलाय तरी मुंबईत समाधानकारक पाऊस अजून तरी झालेला नाही. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्ये अद्यापही पावसाची पुरेशा प्रमाणात हजेरी नाहीय. सध्या असलेला पाणीसाठा मुंबईकरांना 30 जूलैपर्यंतच पुरेल. त्यामुळे सर्वांचेच डोळे आता जुलै महिन्यातल्या पावसाकडे लागलेले आहेत. त्यामुळे जून सारखी जूलैतही पावसानं ओढ दिली तर मुंबईसमोर पाणीसंकट उभं राहण्याची चिन्हं आहेत...


सध्या या सर्व धरणांमध्ये 1 लाख 21 हजार 279 दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी आदी तलाव तसेच धरणांमधून दिवसाला 3800 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची तहान भागवण्यासाठी एकूण 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याचा साठा अपेक्षित असतो.


मुंबईला सर्वाधिक पाण्याचा पुरवठा भातसा धरणातून होते. या धरणातील एकूण पाण्याची क्षमता 7 लाख 17 हजार 37 दशलक्ष लिटर एवढी आहे. पण, या धरणात सध्या 50 हजार 277 दशलक्ष लिटर एवढाच पाणी साठा आहे. या एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत 30 जून 2020 ला या सर्व तलावांमध्ये एकूण पाणीसाठा 1 लाख 21 हजार 279 दशलक्ष लिटर एवढाचा शिल्लक आहे.


जून महिन्यातील सरासरी पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याने नोंदवली असली तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात तुरळकच पाऊस पडलाय. त्यामुळे आता जूलैमधील पावसाचा अंदाज काय असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकीकडे मुंबईतून कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. अशा स्थितीत पाणीटंचाईचं संकट उद्भभवलं तर येत्या काळात पाणीकपातीलाही सामोरं जावं लागेल. त्यामुळे कोरोनापासून लांब राहण्यासाठी हात वारंवार धुवाच पण, तेव्हाही पाणी जपूनच वापरा.