मुंबई : फाळणीनंतरचं सगळ्यात मोठं स्थलांतर देशानं पाहिलं ते कोरोनाच्या काळात. लॉकडाऊनमुळे शहरात जगणं मुश्कील झाल्यानंतर लाखो गोरगरीब मजुरांनी गावाचा रस्ता धरला. कुणी चालत, कुणी सायकलवर तर कुणी मिळेल त्या वाहनानं. पण या स्थलांतराचा चेहरा बनली ती ज्योतिकुमारी पासवान. आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून तिनं 1200 किलोमीटरचा प्रवास पार केला. गुरुग्राम ते दरभंगा या प्रवासात तिला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. पण आता याच ज्योतिकुमारीच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे.


वुईमेक फिल्म्स या बॅनरनं ज्योतिकुमारीचा प्रवास पडद्यावर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्टमध्ये या चित्रपटाचं काम सुरु होईल. ज्योतिकुमारी स्वत:च तिचं पात्र चित्रपटात वठवणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव आत्मनिर्भर असं असणार आहे. ज्योतीनं भोगलेलं दु:ख, तिचा प्रवास आणि काही कल्पनात्मक प्रसंगही या चित्रपटात असणार आहेत असं दिग्दर्शक कृष्णा यांनी सांगितलं. दिल्ली ते दरभंगा या ज्योतिच्या प्रवासाच्या मार्गावर विविध ठिकाणी या चित्रपटाचं चित्रिकरण होणार आहे.

लॉकडाऊन काळात गुरुग्रामवरुन वडिलांना सायकलवर बसवून 1200 किलोमीटर प्रवास करत पोहोचलेल्या ज्योतीचं खूप कौतुक झालं होतं. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इवांका ट्रंपनं देखील ट्वीट करत ज्योतीचं कौतुक केलं होतं. 15 वर्षीय ज्योती कुमारीनं आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल गुरुग्रामवरुन दरभंगा असा 1200 किमी अंतर प्रवास केला होता.

याबाबत ट्वीट करताना इवांकानं म्हटलं होतं की, ''15 वर्षाची ज्योती कुमारी आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून सात दिवसात 1,200 किमीचं अंतर पार करत गावी घेऊन गेली. सहनशक्ती आणि प्रेमाच्या या वीरगाथेनं तिनं भारतीय लोकं आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं लक्ष वेधलं आहे."


ज्योतीच्या या जिद्दीचं कौतुक सर्वत्र झालं होतंच मात्र सायकलिंग फेडरेशननेही तिची दखल घेतली होती. ज्योती कुमारी लॉकडाऊन जाहीर होण्याआधी गुरुग्राम येथे वास्तव्यास होती. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाऊन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाले होते. आजारी वडिलांना कोणत्याही परिस्थितीत बिहारला आपल्या गावी न्यायाचं असल्याने अखेर तिने सायकवरुन वडिलांनी नेण्याचं ठरवलं आणि सात दिवसांत तिने 1200 किमीचा टप्पा गाठत वडिलांना सुखरुप घरी पोहोचवलं. ज्योतीची कहाणी ऐकल्यानंतर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावलं होतं.