सुझुकीचे भारतात 40 वर्ष पूर्ण! भारतात लॉन्च करणार आणखी एक कंपनी
Suzuki completes 40 years in India: आघाडीची वाहन उत्पादक कंपनी सुझुकीने भारतात 40 वर्षे पूर्ण केले आहेत.
Suzuki completes 40 years in India: आघाडीची वाहन उत्पादक कंपनी सुझुकीने भारतात 40 वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंपनीच्या गुजरातमधील हंसलपूर येथे इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणि खरखोडा, हरियाणा येथे पॅसेंजर व्हेईकल प्लांटची पायाभरणी केली. यावेळी मारुती सुझुकीने ईव्ही प्लांटसाठी 10 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात मारुती सुझुकी 2025 पासून इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करू शकते.
भारतात मारुती उद्योग लिमिटेडची स्थापना सन 1981 मध्ये झाली होती. ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी होती. 1982 मध्ये जपानी वाहन उत्पादक कंपनी सुझुकीने मारुतीसोबत एक संयुक्त उपक्रम सुरु केला. गेल्या चाळीस वर्षांत मारुती सुझुकी हा देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रँड बनला आहे. आरसी भार्गव हे मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आहेत.
'भारताचे जपानशी जुने नाते'
यावेळी बोलताना आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, मारुती सुझुकीचे यश भारत आणि जपानमधील मजबूत भागीदारी देखील दर्शवते. गेल्या आठ वर्षांत ही भागीदारी आणखी मजबूत झाली. ते म्हणाले की, भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या मोहिमेत सरकारही प्रोत्साहन देत मदत करत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, गुजरातमध्ये सुझुकी व्यतिरिक्त आणखी 125 जपानी कंपन्या आहेत. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष टी. सुझुकी यांनी सांगितले की, ते भारतात सुझुकी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर इंडिया नावाची दुसरी कंपनी सुरू करणार आहेत. ही सुझुकी जपानची पूर्ण मालकीची कंपनी आहे.
50% बाजारपेठ मिळवण्याचे लक्ष
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (MSI) देशांतर्गत बाजारपेठेतील 50 टक्के हिस्सा परत मिळवण्याचे लक्ष ठेवले आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आरसी भार्गव म्हणाले की, मारुती मागे हटणार नाही आणि बाजारातील 50 टक्के हिस्सा परत मिळवण्यासाठी संघर्ष करेल. मारुती देशात आपल्या कार्याची 40 वर्षे साजरी करत आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीचा बाजार हिस्सा 43.38 टक्क्यांवर घसरला, जो 2018-19 या आर्थिक वर्षातील 51.21 टक्क्यांच्या शिखरावर होता.
देशांतर्गत बाजारपेठेत आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात कंपनीने शहरी भागांव्यतिरिक्त, लहान शहरे आणि ग्रामीण भागातील गरजा पूर्ण करणारे मॉडेल लॉन्च करण्याची योजना आखली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत प्रवासी वाहनांची विक्री 2018-19 आर्थिक वर्षात 33,77,436 युनिट्स होती. जी 2021-22 मध्ये 30,69,499 युनिट्सवर घसरली. मारुती सुझुकीने 2018-19 मध्ये 17,29,826 युनिट्सची आतापर्यंतची सर्वोच्च वार्षिक विक्री गाठली. त्यावेळी कंपनीचा बाजार हिस्सा 51.21 होता. 2021-22 मध्ये ते 43.38 टक्के किंवा 13,31,558 युनिट्सवर घसरले.