Teesta Setalwad : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाकडून सशर्त अंतरिम जामीन मंजूर
Teesta Setalwad : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना सुप्रीम कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
Teesta Setalwad : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड (Teesta Setalwad) यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तिस्ता सेटलवाड या मागील दोन महिन्यांपासून गुजरात पोलिसांच्या कोठडीत आहेत. दोन महिन्यांपासून आरोपी महिला पोलीस कोठडीत असून पोलिसांनी चौकशीदेखील केली आहे. त्यामुळे अंतरिम जामीन देणे योग्य ठरले असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. गुजरात दंगलीबाबत गुजरात सरकारविरोधात खोटे आरोप करणे, खोटी कागदपत्रे सादर करणे आदी आरोप तिस्ता सेटलवाड यांच्याविरोधात आहेत.
सरन्यायाधीश उदय लळीत, न्या. एस. रविंद्र भट आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जाची सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने म्हटले की, मागील दोन महिन्यांपासून आरोपी महिला तुरुंगात आहे. त्याशिवाय, पोलिसांनी त्यांची सात दिवस चौकशीदेखील केली. तिस्ता सेटलवाड यांच्याविरोधातील आरोप हे 2002 मधील प्रकरणाशी आहेत. तर, 2012 पर्यंत कागदपत्रे सादर करण्यात आली नव्हती. महिला आरोपीची कोठडीत चौकशी करण्यात आली. तपासाच्या अनुषंगाने चौकशीच्या काही महत्त्वाच्या घटकांची पूर्तता झाल्याने अंतरिम जामिनावरील सुटका करणे योग्य ठरते असे खंडपीठाने म्हटले.
खंडपीठाने म्हटले की, आमच्या मते अर्जदाराला अंतरिम जामिनावर सोडण्याची आवश्यकता आहे. मात्र, सॉलिसिस्टर जनरल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अद्याप हायकोर्टासमोर प्रलंबित आहे. आरोपी अर्जदाराला जामिनावर सोडावे की नाही, याचा निर्णय हायकोर्टाला घ्यायचा आहे. सध्या आम्ही फक्त अंतरिम जामिनाच्या अनुषंगाने विचार केला असल्याचे खंडपीठाने म्हटले. हायकोर्टात या प्रकरणावरील सुनावणीत खटल्यातील गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेतला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा कोणताही प्रभाव त्यावर नसेल असेही खंडपीठाने म्हटले.
जाफरी प्रकरणातील सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने तिस्ता सेटलवाड यांचीच चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. झाकीया जाफरी यांच्या भावनांचा वापर तिस्ता आपल्यासाठी करत असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले.
गुजरात एसआयटीचे आरोप काय?
काँग्रेसचे दिवगंत नेते अहमद पटेल आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी गुजरात दंगलीनंतर राज्यातील भाजप सरकारविरोधात कट आखला असल्याचा आरोप गुजरात सरकारच्या विशेष चौकशी पथकाने (SIT) आपल्या अहवालात केला. गुजरातची प्रतिमा डागाळण्याचा कट तत्कालीन राज्यसभा खासदार आणि काँग्रेस नेते दिवंगत अहमद पटेल यांच्या इशाऱ्यावर रचण्यात आला होता.
तिस्ता सेटलवाड यांनी दंगल पीडितांसाठी जमवण्यात आलेल्या निधीचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप केला आहे. तिस्ता यांनी या निधीचा वापर खासगी वापरासाठी केला असल्याचे म्हटले. तिस्ता सेटलवाड यांच्या 'सिटीजन फॉर जस्टिस अॅण्ड पीस' (CJP) संस्थेच्या आयडीबीआयमधील बँक खात्यात 63 लाख रुपये आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या सबरंग ट्रस्टच्या खात्यात 88 लाख रुपये जमा करण्यात आले होते. या निधीत मोठी हेराफेरी झाल्याचा आरोप एसआयटीने केला आहे.