केंद्राला कोवॅक्सिन लसीचा 150 रुपये प्रति डोस किमतीने पुरवठा दीर्घकाळ शक्य नाही : भारत बायोटेक
खर्च भागवण्यासाठी खासगी बाजारात जास्त किंमत ठेवणे आवश्यक आहे. भारत बायोटेक कंपनीने आतापर्यंत लस विकसित करण्यासाठी, क्लिनिकल चाचण्या आणि कोवॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी 500 कोटींपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक केली आहे.
नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने मंगळवारी सांगितले की, केंद्र सरकारला प्रति डोस 150 रुपये दराने कोरोनाची लस पुरवठा करणे फार काळ शक्य होणार नाही. केंद्राच्या पुरवठा शुल्कामुळे खासगी क्षेत्रातील किंमतीही बदलत आहे. भारतात खाजगी क्षेत्राला उपलब्ध असलेल्या इतर कोविड लसींच्या तुलनेत कोवॅक्सिन लसीचे जास्तीचे दर योग्य असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. कमी प्रमाणात खरेदी, वितरणातील जास्त खर्च आणि किरकोळ नफा अशी अनेक व्यावसायिक कारणे आहेत.
भारत बायोटेकने एका निवेदनात म्हटलं की, खर्च भागवण्यासाठी खासगी बाजारात जास्त किंमत ठेवणे आवश्यक आहे. कंपनीने आतापर्यंत लस विकसित करण्यासाठी, क्लिनिकल चाचण्या आणि कोवॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी 500 कोटींपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारत बायोटेक सध्या केंद्र सरकारला प्रति मात्रा 150 रुपये दराने, राज्य सरकारांना 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 1200 रुपये प्रति मात्र दराने पुरवठा करत आहे. कंपनीने म्हटले आहे की, भारत सरकारला प्रति डोस 150 रुपये दराने लसीचा पुरवठा करणे दीर्घकाळ शक्य होणार नाही. म्हणूनच, खाजगी बाजारामध्ये त्याची जास्त किंमत मोजावी लागते.
केंद्राच्या सूचनेनुसार लस उत्पादनाच्या एकूण उत्पादनापैकी 10 टक्क्यांपेक्षा कमी खासगी रुग्णालयांना दिली जाते, तर उर्वरित राज्ये आणि केंद्राकडे जाते. भारत बायोटेकने म्हटलं की, अशा परिस्थितीत कोवॅक्सिन लसीला प्रति डोस सरासरी 250 रुपयांपेक्षा कमी किंमत मिळते.
देशातील कोरोना लसींचे खासगी रुग्णालयात दर
कोविशिल्ड लस उत्पादक कंपनीने तिची किंमत 600 रुपये जाहीर केली आहे. यात 30 रुपये जीएसटी आणि सेवा शुल्क 150 रुपये जोडल्याने एकूण किंमत 780 रुपये होते. त्याचप्रमाणे कोवॅक्सिन लस उत्पादक कंपनीने त्याची किंमत 1200 रुपये जाहीर केली आहे. पाच टक्के दराने 60 जीएसटी आणि 150 रुपये सेवा शुल्क मिळून त्याची किंमत 1410 रुपये झाली आहे. तर स्पुतनिक-व्ही लसीची किंमत 948 निश्चित केली आहे. यात जीएसटी 47.40 रुपये जीएसटी आणि 150 रुपये सेवा शुल्क मिळून त्याची एकूण किंमत 1145 रुपये होते.