(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sugar Price : साखरेच्या वाढत्या किंमतीवर येणार नियंत्रण? केंद्र सरकारनं घेतला 'हा' निर्णय
साखरेच्या वाढत्या दरावर (Sugar Price) नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
Sugar Price Hike : साखरेच्या वाढत्या दरावर (Sugar Price) नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी सरकारनं व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, प्रक्रिया करणाऱ्यांना दर आठवड्याला साखरेचा साठा जाहीर करणं बंधनकारक केलं आहे. या व्यापाऱ्यांना प्रत्येक सोमवारी https://esugar.nic.in या पोर्टलवर भेट देऊन त्यांच्या साखर साठ्याची माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाला द्यावी लागणार आहे.
देशातील साखरेच्या किमती नियंत्रित करण्यात सरकारला यश आल्याचे अन्न ग्राहक मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र साखरेच्या दराबाबत साठेबाजी आणि अफवा रोखण्यासाठी साठा जाहीर करणे आवश्यक झाले आहे. दर आठवड्याला हा साठा जाहीर केल्यास साखरेच्या किमती नियंत्रित ठेवण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. साठेबाजी आणि अफवा रोखल्यास ग्राहकांना परवडणाऱ्या दरात साखर उपलब्ध होण्यास मदत होईल. स्टॉकचे निरीक्षण करून, सरकारला बाजारातील कोणत्याही संभाव्य फेरफारविरुद्ध कारवाई करणे सोपे जाईल असं सरकारनं म्हटलं आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या साखर कारखानदारांवर कडक कारवाई होणार
साखरेचा साठा जाहीर करणं बंधनकारक केल्यानं सरकारला साखरेच्या साठ्याचा रिअल टाईम डेटा मिळू शकणार आहे. सर्व माहिती मिळाल्यामुळं सरकारला आवश्यक असल्यास कोणतीही धोरणात्मक कारवाई करणं शक्य होणार आहे. दरम्यान, यामुळं नियमांचे पालन न करणाऱ्या साखर कारखानदारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ऑगस्ट 2023 अखेर 83 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा होता. ऑक्टोबरपासून गाळप सुरू झाल्यानंतर देशात साखरेचा पुरेसा साठा असेल आणि सणासुदीच्या काळात साखरेचा तुटवडा भासणार नाही. सरकारने 13 लाख मेट्रिक टन साखर खुल्या बाजारात विक्रीसाठी आणली आहे. आगामी काळात आणखी कोटा जारी केला जाऊ शकतो. त्यामुळं ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध करुन देण्याची शक्यता आहे.
साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता
यावर्षी देशात साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण ऊस उत्पादक राज्यांमध्ये पावसानं दडी मारली आहे. याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळं सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवम्यात आली होती. सर्वात जास्त साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे. यंदा राज्यातील साखर उत्पादनात 14 टक्क्यांपर्यंत घट दिसून येत आहे. मागील चार वर्षांतील उत्पादनाच्या तुलनेत यंदा राज्यात साखरेचं सर्वात कमी उत्पादन झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Sugar Price: ऐन सणासुदीत साखरेचा गोडवा होणार कमी? येत्या काळात साखर महागण्याची शक्यता