(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा तुर्तास हटवला
एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला ताकीद देत नंतर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबणा करण्यात आली होती. या सगळ्या गदारोळानंतर आता तूर्तास तरी हा पुतळा तिथून हटवण्यात आला आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह, सुभाषचंद्र बोस यांचा एकत्रित पुतळा तूर्तास हटवण्यात आला आहे. स्टुडन्ट युनियनचा अध्यक्ष शक्ती सिंह ज्याने हा पुतळा बसवला होता त्याने शनिवारी मध्यरात्री स्वत:च हा पुतळा हटवला आहे.
परवानगीशिवाय हा पुतळा विद्यापीठात लावण्यात आला होता. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या आदेशानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. भगतसिंह आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत सावरकरांचा पुतळा असल्याने त्यावरुन वादही झाला होता.
'नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया'च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला ताकीद देत नंतर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबणा केली होती. या सगळ्या गदारोळानंतर आता तूर्तास तरी हा पुतळा तिथून हटवण्यात आला आहे. सध्या हा पुतळा सुरक्षित ठिकाणी असून विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका झाल्यानंतर तो पुन्हा विद्यापीठ परिसरात लावण्यात येईल, असं आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्याचं अभाविपने सांगितलं आहे.
'नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया'च्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (22 ऑगस्ट) सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करत, 'भगतसिंह अमर रहें' आणि 'बोस अमर रहें' अशी घोषणाबाजीही केली होती. शिवाय त्यांच्या कृत्याचे फोटोही व्हायरल झाले होते.