Sri Lanka Thanks India : गेल्या वर्षी श्रीलंकेला (Sri Lanka) आर्थिक संकटाचा (Economic Crisis) सामना करावा लागला होता तेव्हा संपूर्ण देशात रक्तपाताचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यावेळी भारताने (India) पुढे येऊन श्रीलंकेला मदत केली होती. याच प्रकरणी भारताचे आभार व्यक्त करताना श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने (Mahinda Yapa Abhaywardene) म्हणाले की, "भारताने श्रीलंकेला ज्या पद्धतीने मदत केली तशी मदत इतर कोणत्याही देशाने केली नाही."


गेल्या वर्षी श्रीलंकेला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. या दरम्यान भारताने आपुलकी दाखवत कोलंबोला वेगवेगळ्या माध्यमाद्वारे सुमारे चार अब्ज डॉलर्सची मदत दिली होती. शुक्रवारी (6 जुलै) येथे इंडियन ट्रॅव्हल काँग्रेसच्या प्रतिनिधींसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात महिंदा यापा अभयवर्धने म्हणाले की, आर्थिक संकटाच्या काळात भारताने आम्हाला वाचवले, अन्यथा आम्हा सर्वांना आणखी एका रक्तपाताला सामोरे जावे लागले असते.


भारताचे आभार व्यक्त केले 


महिंदा यापा अभयवर्धने यांनी आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेला दिलेल्या मदतीबद्दल भारताचे आभार मानले. या दरम्यान त्यांना दोन्ही देश आणि त्यांच्या संस्कृतींमधील संबंध आणि समानता आठवली. अभयवर्धने म्हणाले, “श्रीलंका आणि भारत हे सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि राजकीयदृष्ट्या अतिशय जवळचे देश आहेत. भारत हा श्रीलंकेचा अत्यंत जवळचा विश्वासू मित्र आहे. जेव्हा जेव्हा आम्ही संकटात होतो तेव्हा भारताने आम्हाला नेहमीच मदत केली.


भारताचे राजदूत आणि जवळचे मित्र


महिंदा यापा अभयवर्धने यांनी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले (Gopal Baglay), श्रीलंकेचे पर्यटन आणि भूमी मंत्री हरिन फर्नांडो आणि श्रीलंकेच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारताचे कौतुक केले. बागले यांचा उल्लेख करताना श्रीलंकन ​​संसदेचे अध्यक्ष म्हणाले, "येथे तुमचे (भारतीय) राजदूत आमचे खूप जवळचे मित्र आहेत. आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो.


पीटीआयशी संवाद साधताना महिंदा यापा अभयवर्धने म्हणाले की, संकटकाळी श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारत नेहमीच पुढे आला आहे. तसेच, या आर्थिक संकटात गेल्या वर्षी नवी दिल्लीनेही मदतीचा हात पुढे केला. यामुळे संकटात सहा महिने टिकून राहण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या : 


Seema Haider : 'मी पाकिस्तानात गेले तर वाचणार नाही...', प्रियकरासाठी भारतात आलेल्या सीमाची मुख्यमंत्री योगींना विनवणी; म्हणाली...