India-Pakistan Love Story : प्रेमासाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदरला आता इथेच राहायचे आहे. शनिवारी (8 जुलै 2023) तुरुंगातून सुटल्यानंतर तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना तिचा प्रियकर सचिनबरोबर भारतात राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली. याबरोबरच सीमाने असंही म्हटलं आहे की, जर ती पाकिस्तानात गेली तर तिला तिथे कोणी जिवंत सोडणार नाही. खरंतर, बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी सीमाला 4 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तिचा भारतीय प्रियकर सचिन आणि सचिनच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती.
पाकिस्तानी पती गुलाम हैदरचे दावे फेटाळले
'आज तक' या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सीमाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सचिनबरोबर भारतात राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली. याचं कारण म्हणजे जर ती आता पाकिस्तानात गेली तर तिला तिथे कोणी जिवंत सोडणार नाही. याचबरोबर सीमाने तिचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरचा दावाही फेटाळला आहे. तसेच, पाकिस्तानी पती सतत मारहाण करत असल्याचा आरोपही सीमाने केला आहे. सीमाचं पुढे असंही म्हणणं आहे की, तिचा पती गुलाम तिच्या चेहऱ्यावर मिरच्या फेकून तिच्यावर अत्याचार करायचा. सीमाने दावा केला की, ती गेल्या 4 वर्षांपासून गुलामबरोबर राहत नाही आणि भारतीय प्रियकर सचिनने तिची चारही मुलं दत्तक घेतली आहेत, त्यामुळे आता तिला त्याच्याबरोबरच भारतात राहायचे आहे.
14 दिवसांच्या कोठडीनंतर जामिनावर सुटका
4 जुलै रोजी भारतीय प्रियकर सचिन, त्याचे वडील आणि सीमा यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी तिघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
गेमिंग अॅप PUBG वरून झाली प्रेमाची सुरुवात
सीमा आणि सचिन यांची ओळख PUBG या गेमिंग अॅपच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सचिनच्या प्रेमासाठी सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली. यानंतर दोघांनीही लग्नासाठी संबंधित वकिलाशी चर्चा केली असता सीमाकडे व्हिसा नसून ती बेकायदेशीरपणे भारतात आल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर, वकिलाच्या तक्रारीवरून सचिन, त्याचे वडील आणि सीमा यांना अटक करण्यात आली असून 14 दिवसांच्या कोठडीनंतर तिघांनाही जामीन मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :