Sri Lanka Crisis: श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा, राष्ट्रपती राजपक्षेंनी देशातून पलायन केल्याने कोलंबोमध्ये हिंसक निदर्शने
Sri Lanka Crisis: राष्ट्रपती राजपक्षेंनी देशातून पलायन केल्याने कोलंबोमध्ये हिंसक निदर्शने होत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.
Sri Lanka Crisis: श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapakse) यांनी देशातून पलायन करत मालदीवसाठी रवाना झाल्याच्या वृत्ताला एएफपी या वृत्तसंस्थेने दुजोरा दिला आहे. राष्ट्रपतींनी देशातून पलायन केल्याने कोलंबोमध्ये हिंसक निदर्शने होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाकडून श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.
#BREAKING Sri Lanka declares state of emergency after president flees: PM's office pic.twitter.com/0IkJMZKKJV
— AFP News Agency (@AFP) July 13, 2022
श्रीलंकेत पुन्हा एकदा हिंसक निदर्शने
बुधवारी पहाटे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या पलायनामुळे श्रीलंकेत पुन्हा एकदा हिंसक निदर्शने पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. हे लोक संसदेच्या दिशेने कूच करत आहेत. दुसरीकडे, संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. आंदोलकांनी लष्कराचे वाहनही अडवले आहे. दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे देशातून पळून मालदीवमध्ये पोहोचले आहेत. श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने गोटाबाया यांच्या जाण्याला दुजोरा दिला आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रपतींच्या पलायनाची पुष्टी
संरक्षण अधिकार्यांचे म्हणणे आहे की राजपक्षे यांनी काल रात्री त्यांना विमानासाठी विनंती केली होती. राजपक्षे हे राष्ट्रपती म्हणून संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर आहेत. पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या कार्यालयानेही राष्ट्रपतींनी देश सोडल्याची पुष्टी केली आहे.
भारतीय उच्चायुक्तांनी हे वृत्त फेटाळले
कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांचे भाऊ बासिल राजपक्षे यांना पळून जाण्यास भारताने मदत केल्याच्या वृत्ताचे खंडन केले. उच्चायुक्तांनी हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे आणि भारत श्रीलंकेतील लोकांना पाठिंबा देत राहील असेही म्हटले आहे.
गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळून गेले
एएफपीनुसार, असा दावा केला जात आहे की, स्थानिक अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आज पहाटे लष्करी विमानातून देशातून पलायन केले. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्यानंतर शेजारील देश मालदीव मध्ये गेल्याचा दावा एएफपीच्या अहवालात करण्यात आला आहे.