(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दादरा-नगरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला; कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय
Dadra & Nagar Haveli loksabha bypoll election महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला आहे. दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय झाला आहे.
सिल्वासा: दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. कलाबेन डेलकर यांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा 51 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला आहे. डेलकर यांच्या या विजयामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.
1990 मध्ये उत्तर प्रदेशात पवन पांडे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर आता महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचं पहिलं सीमोल्लंघन आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने जोर लावला होता. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या. तर, दुसरीकडे भाजपनेदेखील या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली होती. ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या या मतदानाची आज मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या 24 व्या फेरीअखेरपर्यंत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना एक लाख 17 हजार 590 मते मिळाली. तर, प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे महेश गावित यांना 66 हजार 610 मते मिळाली. काँग्रेस उमेदवार महेश धोडी यांना अवघी 6104 मते मिळाली.
दिवंगत खासदार मोहन डेलकर हे लोकसभा निवडणुकीत सात वेळेस निवडून आले होते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोहन डेलकर यांनी भाजप खासदार नथुभाई पटेल यांचा 9000 मतांनी पराभव केला होता. मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये 22 फेब्रुवारी 2021 रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते.
शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक नाही
कलाबेन डेलकर यांनी बॅट या चिन्हावर निवडणूक लढवली. निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर 72 तासांमध्ये शिवसेनेकडून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. त्यामुळे शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले नाही. मागील लोकसभा निवडणुकीत मोहन डेलकर यांचेही बॅट हे निवडणूक चिन्ह होते.