Rajya Sabha Election : शिवसेनेचा सहाव्या जागेवर दावा, महाविकास आघाडी साथ देणार?
Rajya Sabha Election : पुढच्या महिन्यात राज्यसभेची निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीची आकडेवारी तर जुळत आहे पण संभाजीराजे छत्रपती यांच्या एन्ट्रीमुळे चुरस निर्माण झाली आहे.
मुंबई : महापालिका निवडणुकीआधी राज्यसभेच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यात राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी होईल. तर, सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे आहे त्यात शिवसेनेने आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे.
दुसरीकडे भाजपही सहाव्या जागेसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. भाजपने जर हा उमेदवार रिंगणात उतरवला तर फोडाफोडीचं राजकारण पाहयला मिळू शकतं. त्यामुळे सहाव्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच आणि राजकारण पाहायला मिळू शकतं.
संभाजीराजे छत्रपती राज्यसभेच्या रिंगणात आहेत, आपल्याला सर्व पक्षांनी मदत करावी असं आवाहन केलं आहे. पण याआधीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत राज्यसभेला शिवसेनेला मदत करण्याचं ठरलं आहे. त्यात शरद पवारांची छत्रपतींना मदत करणार असल्याची क्लिप जास्तीत जास्त व्हायरल केली जात आहे. त्यामुळे सहावी जागा कोणाचा पदरात पडणार यावर चर्चा सुरु आहे.
यंदा महाराष्ट्रातील संजय राऊत, विकास महात्मे, पियूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, प्रफुल्ल पटेल आणि पी चिदंबरम अशा सहा खासदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यात सध्याच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, शिवसेनेचा 1 आणि काँग्रेसचा 1 खासदार निवडून येऊ शकतो. सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावेदारी सांगितली आहे.
राज्यसभेसाठी गणित कसं असतं?
- सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार होते.
- आमदार रमेश लटकेचं निधन झाल्याने ती संख्या 168 होत आहे
- शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ
- तर भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत
- राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते
- महाविकास आघाडीकडे 168 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत.
- संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो.
- तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात.
- तिसरी जागा भाजपने लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते
कट्टर शिवसैनिकाला राज्यसभा देणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांना दिला होता. आता हा विश्वास पूर्ण करायची वेळ आली आहे. राष्ट्रवादीने आपला शब्द पाळला तर शिवसैनिक राज्यसभेवर सहज जाऊ शकेल पण दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती देखील जोर लावत आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेचा मुकुट कुणाच्या डोक्यावर बसणार हे येत्या काही दिवसांतच कळेल.