नवी दिल्ली : एकीकडे संपूर्ण देश निर्भयाच्या दोषींना फासावर कधी लटकावणार याची वाट पाहत आहे, मात्र दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. "सोनिया गांधींप्रमाणे निर्भयाच्या आईनेही दोषींना माफ करावं," असं आवाहन इंदिरा जयसिंह यांनी केलं आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी शुक्रवारी (17 जानेवीर) सोनिया गांधी यांचं उदाहरण देत म्हटलं होतं की त्यांनी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ केलं होतं, त्याचप्रमाणे निर्भयाच्या आईनेही करावं.


ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी यासंदर्भात शुक्रवारी ट्वीट केलं होतं. त्यांनी लिहिलं आहे की, "मी आशादेवी यांच्या भावना समजू शकते. तरीही मी त्यांना आवाहन करते की, "त्यांनी सोनिया गांधींच्या उदाहरणाचं अनुकरण करावं, ज्यांनी नलिनीला माफ करुन तिला मृत्युदंड नको असं म्हटलं होतं." आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण मृत्युदंडाला विरोध आहे.





निर्भयाच्या आईचा संताप
इंदिरा जयसिंह यांच्या सल्ल्यावर निर्भयाच्या आईने संताप व्यक्त केला आहे. "मला हा सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह कोण आहेत? दोषींना फाशी द्यावी, अशी संपूर्ण देशाची मागणी आहे. त्यांच्यासारख्या लोकांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही. इंदिरा जयसिंह मला असा सल्ला देण्याची हिंमत कशी काय करु शकतात? मागील काही वर्षात सुप्रीम कोर्टात माझी आणि त्यांची अनेक वेळा भेट झाली. त्यांनी एकदाही माझी विचारपूस केली नाही आणि आज त्या दोषींसाठी बोलत आहेत? असे लोक बलात्कारांचं समर्थन करुन पैसे कमावतात. त्यामुळे बलात्काराच्या घटना थाबंत नाहीत," अशी उद्विग्न प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.





गांधी कुटुंबाकडून शिक्षा माफ
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणात नलिनीला दोषी ठरवण्यात आलं होतं. 1991 मध्ये या प्रकरणी तिची तुरुंगात रवानगी झाली होती. नलिनी 26 वर्ष जेलमध्ये होती. 2008 मध्ये प्रियांका गांधी वाड्राने तिची भेट घेतली होती. त्यानंतर गांधी कुटुंबाने तिला माफ केलं होतं.


1 फेब्रुवारीला दोषींना फाशी?
दिल्लीत 16 डिसेंबर, 2012 रोजी सामूहिक बलात्कारानंतर निर्भयाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. आता 1 फेब्रुवारीला फाशी देण्याबाबत दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंट जारी केला आहे. याआधीचा डेथ वॉरंट 22 जानेवारीचा होता. परंतु दोषी मुकेश सिंहने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दयेचा अर्ज केला होता. राष्ट्रपतींनी त्याचा अर्ज फेटाळला. परंतु त्यानंतर चौदा दिवसांनी फाशी देण्याचा नियम आहे. त्यामुळे आता उर्वरित तीन दोषींनी दयेचा अर्ज केला नाही तर दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी होण्याची शक्यता आहे.


काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?


- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.
- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.
- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.
- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.
- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.
- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.


दरम्यान, पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा अशी या चार दोषींची नावं आहेत. तर या प्रकरणातील राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होती. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन असल्याने, ज्युवेनाईल कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. 2015 रोजी त्याची सुटका झाली. त्यानंतर चारही दोषींनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने यांच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या होत्या.


संबंधित बातम्या


निर्भया प्रकरणात फाशीची तारीख पुढे ढकलली, आता 1 फेब्रुवारीला दोषींना फाशी


Nirbhaya Case | राष्ट्रपतींनी दोषी मुकेश सिंहच्या दयेचा अर्ज फेटाळला!


निर्भया प्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला फाशी नाही....


निर्भयाच्या दोषींच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाची मोहोर; सुधारित याचिका फेटाळली


तिहार जेलमध्ये निर्भयाच्या दोषींच्या फाशीची तालिम; 22 जानेवारीला देण्यात येणार फाशी


निर्भया प्रकरणातील एका दोषीची सुप्रीम कोर्टात सुधारित याचिका; फाशीला स्थगिती देण्याची मागणी


निर्भयाच्या दोषींविरोधात न्यायालयाने जारी केलेलं 'डेथ वॉरंट' आहे तरी काय?


निर्भयाच्या दोषींना फाशीच; 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता शिक्षेवर अंमलबजावणी