नवी दिल्ली : निर्भयाच्या दोषींच्या विरोधात 'डेथ वॉरंट' जारी करण्यात आलं आहे. डेथ वॉरंटला फॉर्म नंबर 42 असंही म्हटलं जातं. कोणत्याही प्रकरणातील दोषींना जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येते. त्यावेळी कोर्ट हे वॉरंट जारी करतं. निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींच्या विरोधात दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंट जारी केलं आहे.


16 डिसेंबर 2012 रोजी निर्भया ज्या बसने प्रवास करत होती, त्याच बसमध्ये तिच्यावर काही नराधमांनी बलात्कार केला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून या नराधमांना फाशी देण्याच्या मागणीने जोर धरला होता. याच प्रकरणी दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंट जारी करत दोषींच्या फाशीची तारिख निश्चित केली आहे. जाणून घेऊया डेथ वॉरंट म्हणजे काय?


कोणत्याही दोषीला ज्यावेळी न्यायालयाकडून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येते, त्यावेळी त्याच्या विरोधात डेथ वॉरंट जारी करण्यात येतं. या वॉरंटला दंड प्रक्रिया संहिता म्हणजेच, सीआरपीसीचा फॉर्म नंबर 42 असंही म्हटलं जातं. ज्यामध्ये दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्याचा आदेश दिला जातो. याला क्रिमिनल प्रोसिजरच्या फॉर्म नंबर 42 च्या छापलेल्या तीन वाक्यांच्या दुसऱ्या भागाचा हिस्सा मानला जातो. तसेच याला ब्लॅक वॉरंट असंही म्हटलं जातं. कायद्याच्या भाषेत या फॉर्म 42 ला 'वॉरंट ऑफ एक्जीक्यूशन ऑफ ए सेंटेंस ऑफ डेथ' असं म्हटलं जातं.


न्यायालयाने जारी केलेलं हे वॉरंट जेल प्रशासनाच्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवण्यात येतं. जिथे दोषींना कैदेत ठेवण्यात आलं आहे. या वॉरंटमध्ये दोषींच्या नावासोबतच त्यांला ठोठावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा सुनिश्चित करण्यात आलेली असते. यामध्ये फाशी देण्याची वेळ आणि स्थळदेखील सांगण्यात आलेलं असतं. तसेच शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधिशांची स्वाक्षरीही असते. या वॉरंटनंतर दोषींना तोपर्यंत फासावर लटकवून ठेवण्यात येतं जोपर्यंत त्या दोषीचा मृत्यू होत नाही.


संबंधित बातम्या : 


निर्भयाच्या दोषींना फाशीच; 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता शिक्षेवर अंमलबजावणी