बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांवर सातत्याने अन्यायाचा वरवंटा फिरवत असणाऱ्या कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून रोखून आपल्या दडपशाहीचे पुन्हा एकदा दर्शन घडवले आहे. अभिवादन करण्याच्या स्थळापासून दहा फूट अंतरावर पोलिसांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यास अटकाव करून धक्काबुक्की केली. यावेळी मंत्र्यांचे सहकारी आणि पोलीस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झडली. अखेर पोलिसांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना एका खासगी वाहनातून पोलीस आयुक्तालयाकडे नेले आणि तेथून त्यांना कोगनोळी येथे नेवून सोडले.


मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हुतात्मा दिन कार्यक्रमाला येणार असल्याची कुणकुण पोलीस खात्याला लागली होती. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस फौजफाटा कोगनोळी येथे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तैनात करण्यात आला होता. त्यामुळे मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गनिमी काव्याने बसमधून प्रवास करून बेळगाव गाठले. नंतर हुतात्मा चौकात ते रिक्षाने दाखल झाले. यावेळी पोलिसांनी त्यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून रोखून आपल्या ताब्यात घेतले.

गनिमी कावा करून मी बेळगावात आलो यात विशेष काही नाही .मी काही विशेष केलेले नाही. सीमालढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान आणि त्याग मोठा आहे. त्यांच्या तुलनेत माझे धाडस काहीच नाही. महाराष्ट्र सरकार सीमा बांधवांच्या पाठीशी आहे हा संदेश घेऊन आपण बेळगावात आल्याचे मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

17 जानेवारी 1956 रोजी सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, महिला आघाडी आणि युवा समितीतर्फे अभिवादन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, समितीचे नेते किरण ठाकूर, माजी महापौर सरिता पाटील, महिला आघाडी अध्यक्ष रेणू किल्लेकर, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर यांच्यासह अनेकांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नंतर रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली आणि किर्लोस्कर रोड या मार्गावरून फेरी काढाण्यात आली. अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर ,भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. नंतर मोर्चाचे रूपांतर हुतात्मा चौक येथे सभेमध्ये झाले.

भाषावार प्रांत रचनेच्यावेळी अन्यायाने कर्नाटकात मराठी भाषिकांना डांबण्यात आले आहे. हा अन्याय दूर केल्याशिवाय मराठी जनता गप्प बसणार नाही. बेळगाव आणि सीमाभागातील जनतेने एकी अभेद्य राखून सीमाप्रश्न सोडवून घेणे आवश्यक आहे. वर्षानुवर्षे चाललेल्या साहित्य संमेलनाला जिल्हा प्रशासन अटकाव करत आहे .महाराष्ट्रातील नेत्यांना हुतात्मा दिनाला आणायचे नाही अशी नोटीस पोलिसांनी पाठवली आहे. माणसाच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे असे उद्गार समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना काढले.