Ukraine Russia War : युक्रेनमध्ये उतरू शकत नाही विमान, नवीन शेखरप्पाचं पार्थिव खारकिव्हमधून भारतात कसं आणणार?
Ukraine Russia War : युक्रेनमधील बिटक परिस्थितीमुळे तेथे सध्या विमान उतरू शकत नाही. त्यामुळे कर्नाटकमधील नवीन शेखरप्पाचं पार्थिव खारकिव्हमधून भारतात कसं आणणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धात मृत्यू झालेल्या कर्नाटकमधील नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याचं पार्थिव भारतात कसं आणण्यात येईल? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मंगळवारी युक्रेनमधील खारकिव्हमध्ये झालेल्या गोळीबारात नवीनचा मृत्यू झाला आहे. नवीन याच्या मृत्यूला आता 24 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. परंतु, त्याचं पार्थिव अद्याप युक्रेनमध्येच आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून नवीन याचं पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु, युक्रेनमध्ये सध्या एकही विमानतळ सुस्स्थितीत नाही. त्यामुळे युक्रेनमध्ये विमान उतरू शकत नाही. अशा परिस्थितीत नवीन याचं पार्थिव भारतात कसं आणण्यात येणार आहे? यावर अद्यापही पश्नचिन्ह आहे.
नवीनच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या मुद्यावर चार बैठका घेतल्या आहेत. नवीन शेखरप्पा याच्या मृत्यूनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याच्या वडिलांसोबत संवाद साधला आहे. मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, नवीनचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, युक्रेनमधील खारकिव्हमध्ये अजूनही अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. 26 फेब्रुवारीपासून आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे.
नवीन शेखराप्पा हा मूळचा कर्नाटकातील हवेरी जिल्ह्यातील आहे. तो युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता. खारकिव्हमधील नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये तो चौथ्या वर्षात शिकत होता. रशिया-युक्रेनध्ये युद्ध सुरू असतानाच युक्रेनमधील खारकिव्हमध्ये खाद्यपदार्थ आणण्यासाठी बाहेर पडल्यानंतर रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी तो जवळच्या एका सुपरमार्केटमधील रांगेत उभा होता. त्याचवेळी रशियाचा एक बॉम्ब काळ म्हणून आला आणि त्यात त्याचा जीव गेला.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War: जेवणासाठी घराबाहेर पडला अन् घात झाला.... रशियन बॉम्बहल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
- Russia Ukraine War: युक्रेनमध्ये दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, पंजाबमधील विद्यार्थ्याला पक्षाघाताचा झटका
- Russia Ukraine War : मिसाईल हल्ल्यानंतर युक्रेनमधील खारकिव्ह बेचिराख, मन हेलवणारी दृश्य