बंगळुरु : बंगळुरुमधील एका कार्यक्रमात एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या सभेत एका मुलीनं थेट मंचावरुन ओवेसींना आव्हान दिलं. तरुणी माईक हातात घेऊन बोलत असताना ओवेसींसह कार्यकर्त्यांनी मुलीला मंचावरुन खाली उतरवलं. तरुणी 'हिंदुस्थान जिंदाबाद आणि पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देत होती.  हा सर्व गोंधळ कॅमेरात कैद झाला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, या मुलीला घोषणाबाजी करत असताना स्वत: ओवेसींसह कार्यकर्ते रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुणी मंचावरुन बोलण्याचा प्रयत्न करत असताना तिला रोखण्याचे ओवेसी देखील प्रयत्न करत होते.

बंगळुरूमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी ओवेसी यांचं भाषणही झालं. मात्र, ओवेसी भाषण करण्यासाठी उभे राहिल्यानंतर या तरुणीनं व्यासपीठावर गोंधळ घातला. तिचं नाव अमुल्या असल्याचं सांगितलं जात आहे. अमुल्यानं अचानक व्यासपीठावर येऊन माईक हातात घेतला आणि बोलण्यास सुरूवात केली. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने तिचं बोलणं सुरूच ठेवलं.

दरम्यान 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणाबाजी करणाऱ्या या तरुणीच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी आहोत, एमआयएम नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य



 त्यानंतर कार्यकर्त्यांनी तिच्या हातातील माईक हिसकावून घेतला. तसेच तिला बाजूला जाण्यास सांगितलं. मात्र, तरुणीनं व्यासपीठावर समोर येत पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तिने अशा घोषणा देण्यास सुरूवात केल्यानंतर ओवेसींनी तिला धावत जाऊन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शांत होत नसल्यानं कार्यकर्त्यांनी तिला ओढत व्यासपीठावरून खाली नेलं.


 त्या तरुणीचा आमच्याशी काहीही संबंध नाही - ओवेसी

या प्रकरणी बोलताना ओवेसी म्हणाले की, मी नमाज पठन करण्यासाठी चाललो होतो. मात्र तेवढ्यात ती मुलगी आली आणि तिनं अशी घोषणाबाजी सुरु केली. मी तात्काळ तिला रोखले. अशा प्रकारच्या घटनेचा मी निशेध करतो. या प्रकरणी कारवाई व्हायला हवी असं देखील ते म्हणाले. ते म्हणाले की, ही लोकं मूर्ख आहेत. ह्यांना देशाशी काही देणं घेणं नाही. यांना असा गोंधळ घालायचा असेल तर दुसरीकडं जावं, इथं कशाला आले, असं ते म्हणाले. तरुणीनं दिलेल्या घोषणांचा मी निषेध करतो. ज्या तरुणीनं घोषणा दिल्या, तिचा आमच्याशी काहीही संबंध नाही. आमच्यासाठी भारतच जिंदाबाद होता आणि जिंदाबाद राहील, असं देखील ते म्हणाले.



एमआयएमचे वारिस पठाण यांचं चिथावणीखोर वक्तव्य 

आम्ही 15 कोटी आहोत. मात्र, 100 कोटींवर भारी आहोत, असं चिथावणीखोर वक्तव्य एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. इट का जबाब पत्थर से देना हम सिख गए है. एवढंच नव्हे, तर स्वातंत्र्य मागितल्यानं मिळत नाही तर हिसकावून घ्यावं लागतं. मुस्लीम समाजाला चिथवणारी वक्तव्यं वारीस पठाण यांनी कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये केली आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात वारिस पठाण बरळलेत. विशेष म्हणजे यावेळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी देखील उपस्थित होते. वारिस पठणांच्या वक्तव्यानं वाद उफाळण्याची चिन्ह आहेत.