हैदराबाद : नगारिकत्व दुरुस्ती कायदा (CAA)आणि राष्ट्रीय नागरिक नोंदयादी (NRC) विरोधात देशभरात आंदोलनं सुरु आहेत. अनेक राजकीय पक्ष आणि नेते त्याविरोधात उभे ठाकले आहे. एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला आहे.
ओवेसी यांनी काल (21 डिसेंबर) हैदराबादमध्ये CAA विरोधात एक रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान केलेल्या भाषणात ओवेसी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. ओवेसी म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा मुस्लीमविरोधी आहे. तसेच यांनी यामधून धार्मिक अल्पसंख्यांक हा शब्द हटवण्याची मागणी केली आहे.
ओवेसी म्हणाले की, प्रत्येक मुस्लीम हा दहशतवादी नसतो. मुसलमानांनी भारताच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. परंतु हे सरकार मुसलमानांना दुय्यम दर्जा नागरिक बनवू पाहात होतं, आता हेच सरकार या नव्या कायद्याद्वारे मुसलमानांना देशातून हद्दपार करण्याचा कट रचत आहेत.
ओवेसी म्हणाले की, CAA हा काळा कायदा आहे. जे लोक या कायद्याविरोधात आहेत त्यांनी आपआपल्या घराबाहेर तिरंगा फडकवून त्याचा विरोध करा. ओवेसी यांनी यावेळी आंदोलकांना हिंसा न करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, कोणी तुम्हाला आंदोलनादरम्यान त्रास दिला तर तुम्ही हिंसेवर उतरु नका. हिंसा झाली तर आपली बाजू चुकीची ठरेल.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर भारतात हिंसाचार सुरुच
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. शनिवारी उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळण घेतले. कानपूरमध्ये जमावाने एक पोलीस चोकी पेटवून दिली. रामपूरमध्येदेखील मोठा हिंसाचार पहायला मिळाला. तर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाने (राजद) पुकारलेल्या बंददरम्यान मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. त्यामुळे काही तास रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होती.
उत्तर प्रदेशमध्ये गुरुवापासून अनेक ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनांमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवरही हल्ले झाले. यामध्ये 263 पोलीस जखमी झाले आहेत तर 57 पोलील गोळ्या लागून जखमी झाले आहेत. यादरम्यान 705 लोकांना अटक करण्यात आली आहे तर चार हजार 500 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, आंदोलकांनी कानपूरमधील यतीमखाना पोलीस चौकीला पेटवले. याचवेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यामध्ये पोलिसांसह अनेक सामान्य नागरिकही जखमी झाले आहेत. जमाव पांगवण्यासाठी आम्हाला लाठीचार्ज करावा लागला, तसेच अश्रुधूराचा वापर करावा लागला.
स्थानिक पोलिसांनी सांगितले की, कानपूरमधील हिंसाचारानंतर आंदोलनांनी अधिक उग्र रुप घेऊ नये यासाठी खबरदारी म्हणून समाजवादी पक्षाचे आमदार अमिताभ वाजपेयी यांना ताब्यात घेतले आहे, तसेच त्यांची वाहनं काही काळासाठी जप्त केले आहे.