गुलबर्गा : आम्ही 15 कोटी आहोत. मात्र, 100 कोटींवर भारी आहोत, असं चिथावणीखोर वक्तव्य एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलंय. इट का जबाब पत्थर से देना हम सिख गए है. एवढंच नव्हे, तर स्वातंत्र्य मागितल्यानं मिळत नाही तर हिसकावून घ्यावं लागतं. मुस्लीम समाजाला चिथवणारी वक्तव्य वारीस पठाण यांनी कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये केली आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात वारिस पठाण बरळलेत. विशेष म्हणजे यावेळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी देखील उपस्थित होते. वारिस पठणांच्या वक्तव्यानं वाद उफाळण्याची चिन्ह आहेत.


काय म्हणाले वारिस पठाण?
आम्ही 15 कोटी मुस्लीम असलो, तरी 100 कोटींना भारी आहोत. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी 15 फेब्रुवारीला हे वक्तव्य केलं. विशेष म्हणजे याप्रसंगी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती. मात्र, त्यांनी या वक्तव्यावर कुठलाही आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले नाही. "केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही, विटेला दगडाने उत्तर देणं आम्ही शिकलोय. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल आणि जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आलीय. आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं, आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या तरी तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. 15 कोटी आहोत पण 100 कोटींना भारी पडू, लक्षात ठेवा, असं पठाण यावेळी म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलंय.

सामूहिक बलात्कारप्रकरणी भाजप आमदारासह सात जणांवर गुन्हा दाखल

आम्ही 135 कोटी जगात भारी आहोत : शिवसेना आमदार अब्दुल सत्तार
आम्ही 135 कोटी जगात भारी आहोत, भारतात सगळे हिंदुस्थानी राहतात, वारिस पठाण यांनी असं बोलणं योग्य नाही, त्यांनी शब्द परत घ्यावे, समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही. पठाण यांनी शिर्डीला जावे आणि श्रद्धा सबुरी शिकावी, यांचं हे बोलणं म्हणजे त्यांची ही वोट बँक आहे म्हणून ते तसं बोलतात. देश सगळ्यांचा आहे लक्षात ठेवा.
वारीस पठाण हा तद्दन मूर्ख माणूस : जितेंद्र आव्हाड
कोणताही मुस्लीम असं बोलू शकत नाही. इतके दिवस आंदोलन सुरू आहे. मात्र, कुठेही हिंसा झाली नाही. कारण हे आंदोलन संविधानासाठी सुरू आहे. त्याच्यात हे सुपारी मास्टर, भाजपच्या सांगण्यावरून बोलून वातावरण दूषित करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. मात्र, वारिस पठाण यांचं हे मुस्लीम समाज ऐकणार नाही. यांचं मुस्लीम समाजाने ऐकलं असतं तर ते निवडूण आले असते, असेही आव्हाड म्हणाले.
वारीस पठाण यांच्या बोलण्याचा विपर्यास केला : इम्तियाज जलील
वारीस पठाण यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलाय. त्यात तथ्य नाही. पंतप्रधान सगळ्यांचे आहेत, मग आमच्याकडे दुर्लक्ष का? आम्ही इतक्या दिवसांपासून सीएए विरोधात आंदोलन करतोय. मात्र, तुम्ही फक्त दुर्लक्ष करताय. भाषा वापरत असताना शब्दाचा वापर कसा करायचा हे आम्ही आमच्या लोकांना शिकवू. मात्र, मीडियाचा हा सिलेक्टिव्ह अॅप्रोच आहे. इतका जोश वारिस पठाण यांच्याबाबत दाखवता तितका अनुराग ठाकूर आणि योगी आदित्यनाथ यांच्याबाबत का दाखवत नाही? असाही सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. वारिस पठाण यांच्या बोलण्याचं आम्ही समर्थन करत नाहीय. फक्त त्यांच्या बोलण्याचा अर्थ लोकांनी बदलला, ट्विस्ट केलं, आमच्या पक्षाचं धोरण स्पष्ट आहे. आम्ही सगळ्यांसोबत आहोत, त्यांच्या बोलण्याचे स्पष्टीकरण आम्ही त्यांना लिखित मागवू, पक्ष त्यांना याची विचारणा करेल, असं स्पष्टीकरण खासदार इम्तियाज जलील यांनी दिलंय.

Citizenship Amendment Bill | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर स्पष्टता हवी | ABP Majha