प्रजासत्ताक दिनी घातपाताची शक्यता; आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचे सहा लाँच पॅड सक्रिय
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर बीएसएफनं जम्मूतील सांबा आणि कठुआ इथं काही महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. बीएसएफच्या शोधमोहिमेत इथं कठुआतील पंचर पोस्टपासून काही अंतरावरच एक पाकिस्तानी भुयार सापडलं.
जम्मू : यंदाच्या वर्षी देशाच्या प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानकडून भारतात घातपात घडवून आणला जाण्याचा कट रचला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कुरापतींसाठी पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेनजीक असणाऱ्या भागात जवळपास सहा लाँच पॅड सक्रिय केले आहेत. ज्यासाठी पाकिस्तानकडून शक्करगढ जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.
शक्करगढ परिसर हा पाकिस्तानमधील अशा काही भागांमध्ये मोडतो जिथं लाँच पॅड सक्रिय असण्यासोबतच मोठ्या प्रमाणात दहशतवादी तळही सक्रीय असल्याचं म्हटलं जात आहे. याच ठिकाणहून भारताच्या दिशेनं हल्ला होण्याचा सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
याच भागाची निवड का?
बीएसएफच्या वृत्तानुसार पाकिस्तानकडून याच भागाची निवड केली जाण्यामागचं कारण म्हणजे, हा भाग आंतरराष्ट्रीय सीमेवर असण्यासोबतच जम्मू- श्रीनगर महामार्ग, सहना आणि काही इचरही महत्त्वाची ठिकाणं येथून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार शक्करगढ भागातून पाकिस्तानकडून भारतात घुसखोरी केली जाऊ शकते. ज्यासाठी एका भुयाराचा वापर करण्यात येईल.
सदर इशाऱ्यानंर सांबा आणि कठुआ भागात बीएसएफनं अँटी टनलिंग ऑपरेशन सुरु केलं. ज्यादरम्यान शनिवारी पंचर पोस्टहून काही अंतरावर असणाऱ्या भागात एक पाकिस्तानी भुयार आढळून आलं. पाकिस्तानच्या झीरो लाईनपासून हे भुयार जवळपास 150 मीटर आतल्या भागात असून, जमीनीच्या 30 फूट खोल अंतरावर ते खोदण्यात आलं आहे.
BSF च्या माहितीनुसार पाकिस्ताननं बॉर्डर आऊट पोस्ट अभियाल डोगरा आणि किंगरे-दे-कोठे या भागातून हे भुयार खोदण्यात आलं आहे. या भुयाराचं स्थान पाहका आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याची हातमिळवणी झाल्याचं लक्षात येत आहे. या भुयारासाठी फक्त अभियांत्रिकांचीच नव्हे, तर तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली आहे.