Corona VAccination | देशात जलद गतीने लसीकरण, अमेरिका, चीनलाही मागे टाकलं; 92 दिवसात 12 कोटींचा टप्पा पार
महाराष्ट्रात सर्वाधिक 1 कोटी 21 लाख 39 हजार डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात या चार राज्यांत प्रत्येकी एक कोटीपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे.
नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरणाचे काम वेगात सुरू आहे. 92 दिवसात 12 कोटी कोरोना लस डोस देण्यात आले आहेत. 12 कोटी लसींचा टप्पा गाठण्यासाठी अमेरिकेला 97 दिवस आणि चीनला 108 दिवस लागले होते. भारतात पहिला आणि दुससा डोस धरुन आतापर्यंत एकूण 12 कोटी 26 लाख 22 हजार 590 डोस देण्यात आले आहेत. 17 एप्रिल रोजी लसीकरण मोहिमेच्या 92 व्या दिवशी 26 लाख 84 हजार 956 लस डोस देण्यात आले. त्यापैकी 20 लाख 22 हजार 599 लोकांना प्रथम डोस देण्यात आला आणि 6 लाख 62 हजार 357 लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार, एकूण 18 लाख 15 हजार 325 सत्रांद्वारे 12 कोटी 26 लाख 22 हजार 590 लसींचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी 91लाख 28 हजार 146 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 57 लाख 08 हजार 223 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 1 कोटी 12 लाख 33 हजार 415 फ्रन्टलाईन वर्कर्सना पहिला डोस तर 55 लाख 10 हजार 238 फ्रन्टलाईन वर्कर्सना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या 4 कोटी 55 लाख 94 हजार 522 लाभार्थ्यांना लसीची पहिली तर 38 लाख 91 हजार 294 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटातील 4 कोटी 04 लाख 74 हजार 993 लाभार्थ्यांना पहिला तर 10 लाख 81 हजार 759 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
चार राज्यांत कोटींचा टप्पा पार
देशभरात आतापर्यंत दिलेल्या लसींच्या डोसपैकी 59.5 टक्के लसींचे डोस आठ राज्यांत दिले गेले आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 1 कोटी 21 लाख 39 हजार डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात या चार राज्यांत प्रत्येकी एक कोटीपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. गुजरात राज्यात एक कोटी लोकांचे लसीकरण दिनांक 16 एप्रिल रोजी पूर्ण झाले तर इतर राज्यांत ही संख्या दिनांक 14 एप्रिल रोजी पूर्ण झाली.
राज्यात आज 68 हजार 631 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज 68 हजार 631 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 45 हजार 654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 31 लाख 6 हजार 828 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 503 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण 6 लाख 70 हजार 388 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92 टक्के झाले आहे.