Ram Mandir Ayodhya: प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेशात ATS ची मोठी कारवाई; 3 संशयित ताब्यात
Ram Mandir Ayodhya: अयोध्येत यूपी एटीएसकडून तीन संशयित ताब्यात, कॅनडात ठार झालेल्या सुक्खा दुनकेच्या गँगमधले दोघं असल्याची माहिती.
![Ram Mandir Ayodhya: प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेशात ATS ची मोठी कारवाई; 3 संशयित ताब्यात Ram mandir ayodhya uttar pradesh anti Terrorist squad detains three suspects from ayodhya Marathi News Ram Mandir Ayodhya: प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेशात ATS ची मोठी कारवाई; 3 संशयित ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/ab17cb1d1182f61dca6a829b29f384ea170563290351088_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ram Mandir Ayodhya News: अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील दिग्गजांनाही निमंत्रणं पाठवण्यात आली आहे. तसेच, प्रभू श्रीरामाचा भव्य-दिव्य अभिषेक सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशभरातून अनेक रामभक्त 22 जानेवारीला अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. अशातच या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवधूप्रमाणे नटलेल्या अयोध्येला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. या भव्य सोहळ्याला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये, तसेच हा संपूर्ण शिस्तीत पार पडावा यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त अयोध्येत तैनात करण्यात आला आहे. अशातच गुरुवारी 19 जानेवारी रोजी दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) अयोध्येतून तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) विशेष पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, राज्याच्या दहशतवादविरोधी पथकानं अयोध्या जिल्ह्यात तपासणीदरम्यान तीन संशयित लोकांना ताब्यात घेतलं आहे. या संशयितांची चौकशी सुरू असल्याचंही डीजीपी कुमार यांनी सांगितलं आहे. तसेच पुढे बोलताना, आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या तिघांचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध समोर आलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
ड्रोनच्या मदतीनं ठेवली जातेय बारीक नजर
उत्तर प्रदेश सरकारनं ड्रोनची संख्या वाढवली असून ड्रोनद्वारे गस्त घातली जात आहे. शहरात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. राज्य सरकारनं नाईट व्हिजन डिव्हाईस (NVD) आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांसारख्या तंत्रज्ञानाचा संपूर्ण शहरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी समावेश केला आहे. यापूर्वी, अयोध्या आयजी प्रवीण कुमार यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, आम्ही ड्रोनमध्ये एनव्हीडी, इन्फ्रारेड कॅमेरे आणि सीसीटीव्हीसह सर्व प्रकारचं तंत्रज्ञान सुरक्षेसाठी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
अयोध्येत खलिस्तान्यांचा कट?
अयोध्येत आज यूपी एटीएसनं दोन संशयितांना पकडलं. कॅनडात ठार झालेला सुक्खा दुनके आणि अर्श डल्ला यांच्या गँगमधल्या तिघांना यूपी एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे, अयोध्येत हल्ला करण्याचा कट खलिस्तानी संघटना रचतायेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. एटीएससोबतच गुप्तचर खात्याचे अधिकारी देखील या दोघांची कसून चौकशी करतायेत. 22 तारखेच्या सोहळ्याआधी अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. साध्या वेशातले पोलीस आणि Intelligence Bureau चे अधिकारी देखील बारिक नजर ठेवून आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)