राज्यसभेच्या जागेवरुन काँग्रेस राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु आहे. चौथी जागा महाविकास आघाडीत नेमकं कोण लढवणार याबाबत काही ठरत नाही. कारण एकीकडे राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणत आहेत की चौथा उमेदवार एकत्रितपणे ठरेल. मात्र फौजिया खान यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीकडून काही अधिकृत संदेश आलेला नाही.
महाराष्ट्रात 7 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होते आहे. त्यात महाविकास आघाडीच्या 4 जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी 1, काँग्रेस 1, शिवसेना 1 असा प्रत्येक पक्षाचा एक उमेदवार विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादीकडे 17, काँग्रेसकडे 7 तर शिवसेनेकडे 19 मतं अतिरिक्त उरत आहेत. त्यामुळेच चौथा उमेदवार तिघांच्या एकत्रित मदतीवरच निवडून येणार आहे.
महाविकास आघाडीत मंत्रिपदं मिळवताना जी रस्सीखेच पाहायला मिळाली तशीच आता राज्यसभेसाठीही पाहायला मिळत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे दोन खासदार निवृत्त होत आहेत, त्यामुळे परत राष्ट्रवादीचे दोन खासदार निवडून जावेत यासाठी राष्टवादीचा प्रयत्न सुरु आहे. शरद पवार, फौजिया खान यांची नावं निश्चित झाल्याचंही मानलं जातं आहे. पण आता काँग्रेस चौथी जागा सहजासहजी राष्ट्रवादीला द्यायला तयार नाही आणि जरी दिली तरी त्या बदल्यात विधानपरिषद किंवा पुढच्या राज्यसभा निवडणुकीत आपल्याला काय मिळणार याची गणितं काँग्रेसमध्ये सुरु आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेसला तूर्तास एक जागा मिळणार हे निश्चित आहे. त्यासाठी इच्छुक अनेकजण आहेत. मात्र 8 जणांची नावं सोनिया गांधीकडे देण्यात आली आहेत. याआधी काँग्रेसने राजीव शुक्ला, पी चिदंबरम यासारख्या अमराठी लोकांना राज्यसभेवर पाठवलेलं होतं. त्यामुळे यावेळी स्थानिक उमेदवार असावा हा देखील राज्य कार्यकारिणीचा आग्रह आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून कुणाचं नाव पुढे येतं आणि महाविकास आघाडीतल्या चौथ्या जागेचा तिढा नेमका कसा सुटतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
संबंधित बातम्या