नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर या आघाडीची राजकीय ताकद पाहणारी राज्यसभेची पहिली निवडणूक पुढच्या काही दिवसात जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे यावेळी राज्यसभेवर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यसभेच्या सात जागा 2 एप्रिल 2020 ला रिक्त होत आहेत, त्यासाठीची निवडणूक फेब्रुवारी अखेरपर्यंत जाहीर होऊ शकते. यंदा जे सात सदस्य निवृत्त होत आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे.


निवृत्त सदस्यांपैकी शरद पवार, रामदास आठवले यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागणार यात शंका नाही. मात्र उरलेल्यांपैकी कोणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला नव्याने संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, विजया रहाटकर, हंसराज अहिर असे दावेदार आहेत. तर काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे यांना यावेळी राज्यसभेवर संधी मिळणार का याचीही उत्सुकता आहे.


राष्ट्रवादीकडून शरद पवार, भाजपकडून रामदास आठवले परत राज्यसभेवर येणार यात शंका नाही. महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर 7 पैकी 4 खासदार त्यांचे निवडून येऊ शकतात. त्यामुळे यात राष्ट्रवादीला दोन खासदार, शिवसेनेला एक, काँग्रेसला एक अशी विभागणी होऊ शकते. शिवसेनेच्या मदतीची भरपाई पुढच्या वेळी त्यांना अधिक सीट देऊन केली जाऊ शकते अशी चर्चा आहे.


राज्यसभेसाठी सर्वात जास्त स्पर्धा भाजपमध्ये आहे. साताऱ्यातून लोकसभा निवडणूक हारलेले उदयनराजे भोसले, शिवसेनेमुळे तिकीट नाकारलेले किरीट सोमय्या, मागच्या वेळी ज्यांना राज्यसभा अर्ज माघारी घ्यावा लागला त्या विजया रहाटकर याशिवाय माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर असे अनेक दावेदार भाजपकडून आहेत. मात्र यापैकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.


काँग्रेसकडून हुसैन दलवाई यांच्या दोन टर्म पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी सुशीलकुमार शिंदे यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना संधी मिळणार का याचीही उत्सुकता असेल. महाराष्ट्रातून एकूण 19 खासदार राज्यसभेवर जातात. दर दोन वर्षांनी 7, 6 आणि 6 अशा जागा रिक्त होतात. सहा वर्षांपूर्वी जेव्हा 7 जागांसाठी निवड झाली होती तेव्हा ती बिनविरोध झाली होती. आता याहीवेळी ही निवडणूक बिनविरोध होणार की एखादा जास्तीचा उमेदवार रिंगणात येऊन घोडेबाजाराला ऊत येणार हे देखील पाहावं लागेल.