Weather Update: 22 आणि 23 फेब्रुवारीला दिल्लीसह आसपासच्या परिसरात पावसाचा अंदाज, महाराष्ट्रात उन्हाचा चटका
उत्तर भारतातील राज्यामध्ये किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे.
Weather Update : उत्तर भारतात उष्णतेमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. तसेच उत्तर भारतातील राज्यामध्ये किमान तापमानात देखील सातत्याने वाढ होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये देखील थंडीचा कडाका कमी झाला आहे. मात्र, सकाळी आणि रात्री धुके पडत आहे. दरम्यन, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभर हलके वारे वाहणार असून, त्यामुळे हवामानात थोडीशी थंडी जाणवू शकते. तसेच 22 आणि 23 फेब्रुवारीला दिल्ली आणि आसपासच्या परिसरात पावसाचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही उन्हाचा चटका वाढत आहे. अद्याप विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात थंडी कायम आहे.
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशात 21 फेब्रुवारीला हवामान स्वच्छ राहील. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 22 आणि 23 फेब्रुवारीला राज्यातील अनेक भागात हिमवृष्टी आणि पाऊस होऊ शकतो. दोन दिवस पावसाची शक्यता लक्षात घेता मध्यवर्ती डोंगराळ जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशात वाढत्या उन्हामुळे नागरिकांना थंडीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, सकाळी आणि रात्री लोकांना थोडीशी थंडी जाणवेल. काल राज्यातील पंचमढी, नर्मदापुरम, बैतूल, छिंदवाडा, सिवनी, बालाघाट, मांडला आणि दिंडोरी येथे हलका पाऊस झाला. आकाशातील ढगांमुळे रात्रीचे तापमान काही ठिकाणी साडेचार अंशांपर्यंत पोहोचले होते. दुसरीकडे, आयएमडीवर विश्वास ठेवला तर, पुढील दोन दिवस हवामान असेच राहण्याचा अंदाज आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडू शकतो.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सूर्यप्रकाशामुळे वातावरण स्वच्छ आहे. मात्र, यंदा राज्यात उष्मा लवकर येणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर मार्च महिन्यात होळीच्या आसपास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
बिहार
बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील. IMD नुसार, पाटणासह अनेक शहरांचे कमाल तापमान 26 अंश आहे तर किमान तापमान 13 अंश राहण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी 20 फेब्रुवारीला अनेक भागात पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल. यानंतर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
पंजाब
पंजामध्ये देखील हवामान सध्या स्वच्छ होत आहे. हळूहळू पंजाबमधील थंडीचा कडाका कमी होत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये पुढचे काही दिवस हवामान असेच राहणार आहे.
जम्मू-कश्मीर
आज कश्मीरच्या काही भागांमध्ये आज पाऊस आमि बर्फवृष्टी होण्याच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जम्मू विभागातही आजपासून ढगाळ वातावरण राहणार असून, कमाल तापमान 11 अंश आणि किमान तापमान -1 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या तीन ते चार दिवसांत अनेक भागांत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.