राहुल गांधींकडून आंतरराष्ट्रीय योगदिनाची खिल्ली, जवानांचाही अपमान केल्याचा आरोप
राहुल गांधींनी योग दिनाची खिल्ली उडवली मात्र भारतीय जवान मोठ्या प्रमाणावर योग दिन साजरा करताना दिसले. राजस्थानच्या वाळवंटापासून 'आयएनएस विराट'वर देखील भारतीय जवानांनी योगाभ्यास केला. जम्मू काश्मीरमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह पाहायला मिळाला.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश-विदेशात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. देश फिट राहावा यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. एकीकडे योग दिनाचा उत्साह असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मात्र योग दिवसाची खिल्ली उडवली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्वीट करत योग दिनानिमित्त सुरु असलेल्या विविध कार्यक्रमांवर टीका केली आहे. राहुल गांधींनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे, त्यामध्ये भारतीय जवान श्वानांसोबत योग करताना दिसत आहेत. यावेळी श्वान देखील योग करत आहेत. या फोटोला राहुल गांधींनी 'न्यू इंडिया' असं कॅप्शन दिलं आहे. मात्र या ट्वीटवरून राहुल गांधींना नेटिझन्स टार्गेट करत आहेत.
New India. pic.twitter.com/10yDJJVAHD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 21, 2019
राहुल गांधींनी योग दिनाची खिल्ली उडवली आहे, मात्र भारतीय जवान मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करताना दिसले. जम्मू काश्मीरच्या गोठवणाऱ्या थंडीपासून, राजस्थानच्या वाळवंटापर्यंत आणि 'आयएनएस विराट'वर देखील भारतीय जवानांनी योगाभ्यास केला. जम्मू काश्मीरमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. लेहमध्ये इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस दलाच्या जवानांनी योगासनं सादर केली.
इंडो-तिबेटीयन ब़ॉर्डर पोलीस अर्थात आयटीबीपीतील जवानांनी उत्तर लडाखमध्ये 1800 फूट उंचीवर योग प्रात्यक्षिके सादर केली. उणे 20 अंश सेल्सिअसमध्ये, कडाक्याच्या थंडीत जवानांनी तापमानाचाही विचार न करता योगासनं सादर केली.
VIDEO | योगाच्या माध्यमातून भारत-पाक तणाव कमी होईल- बाबा रामदेव