Rahul Gandhi : एक-दोन नव्हे... राहुल गांधींवर बदनामीचे 6 वेगवेगळे खटले सुरू, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे, या विधानामुळे गुजरातच्या सुरत न्यायालयाने गुरुवारी राहुल यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय.
Rahul Gandhi Defamation Case : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 'मोदी' या नावावरून केलेल्या टीकेमुळे त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. 'सर्व चोरांचं आडनाव मोदीचं आहे का', असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. 2019 मधील प्रकरणामध्ये सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीचा दोषी ठरवत आणि त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
कर्नाटकातील एका सभेत राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं होतं की, 'सर्व चोरांना मोदींचं आडनाव का आहे' या वक्तव्यामुळे मानहानी प्रकरणी त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाकडून शिक्षा झाल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. राहुल गांधी यांना भादंवि 499 आणि 500 कलमाअंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर एक किंवा दोन नाही तर सहा वेगवेगळे मानहानीचे खटले दाखल आहेत. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
1. ''गांधींच्या हत्येत संघाचा हात''
राहुल गांधींवर आरोप आहे की, 6 मार्च 2014 रोजी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, 'ज्या आरएसएसच्या लोकांनी गांधीजींची हत्या केली आणि आज ते गांधीजींबद्दल बोलतात.' या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भिवंडी विभागाचे राष्ट्रीय सचिव राजेश कुंटे यांनी 2018 मध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.
2. आसाम मठावर भाष्य
डिसेंबर 2015 मध्ये, आसाममधील आरएसएस स्वयंसेवकाने राहुल यांच्यावर फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. या संघ स्वयंसेवकाने दावा केला होता की, आपण आरएसएसशी संबंधित असल्यामुळे त्यांना आसाममधील बारपेटा सत्रा येथे जाण्यापासून रोखण्यात आलं. या प्रकरणी संघाच्या एका सदस्याने खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांचे वकील अंशुमन बोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अजूनही स्थानिक न्यायालयात सुरू आहे. वकिलाच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण सुनावणीच्या अंतिम टप्प्यात आहे.
3. नोटाबंदीबाबत अमित शाह यांच्यावर टीका
23 जून 2018 रोजी केलेल्या ट्विटच्या आधारे राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित शाह यांचे अभिनंदन, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यांनी ट्विट केलं होतं की, ''तुमच्या बँकेला 750 चं प्रथम पारितोषिक मिळालं. पाच दिवसांत कोटी! ज्या लाखो भारतीयांचे आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केले, नोटाबंदीच्या तुमच्या कर्तृत्वाला सलाम करतो.#शाहझ्यादाखागया"
या प्रकरणावर राहुल गांधी यांचे वकील अजित जडेजा यांनी सांगितले की, अद्याप तपास सुरू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 जुलै रोजी होणार आहे.
4. राफेलवर टीका
नोव्हेंबर 2018 मध्ये, महाराष्ट्र भाजप नेते महेश श्रीश्रीमल यांनी राहुल यांच्या 'कमांडर-इन थीफ' टीकेविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. राहुल गांधी यांनी राफेलवरनू पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला होता. यावरून महेश श्रीश्रीमल यांनी खटला दाखल केला होता. काही दिवसांच्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली. राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि तक्रार रद्द करण्याची मागणीही केली होती. या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.
5. ''संघाने विरोधकांना मारलं''
फेब्रुवारी 2019 मध्ये, राहुल आणि सीपीआय(एम) जनरल सीताराम येचुरी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि वकील धृतिमान जोशी यांनी हा खटला दाखल केला आहे.
धृतिमान जोशी यांनी याचिकेत म्हटलं होतं की, पत्रकार गौरी लंकेशच्या हत्येनंतर 24 तासांनंतर राहुल यांनी वक्तव्य केलं होतं की, जर कोणी आरएसएस आणि भाजपच्या विचारसरणीविरोधात बोलत असेल तर त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यावर दबाव आणला जातो. त्याला बेदम मारहाण केली जाते. त्यांच्यावर हल्ले केले जातात, त्यांना मारलं जातं.
सीताराम येचुरी यांच्यावर आरोप करताना तक्रारकर्त्याने म्हटले होते की, गौरी लंकेश उजव्या विचारसरणीच्या राजकारणावर तीव्र टीका करण्यासाठी ओळखल्या जात होत्या. लंकेश यांच्या हत्येमागे आरएसएसची विचारधारा आणि आरएसएसचे लोक आहेत.
त्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट पीआयने राहुल आणि येचुरी यांचा खटला रद्द करण्याची विनंती फेटाळली. या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.
6. भाजप नेते अमित शाह यांच्यावर टीका
अहमदाबादमधील भाजप नगरसेवक कृष्णवदन ब्रह्मभट्ट यांनी मे 2019 मध्ये अहमदाबाद येथील न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. कृष्णवदन ब्रह्मभट्ट यांनी याचिकेत म्हटलं की, राहुल गांधी यांनी जबलपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित शाह यांना ‘हत्येचा आरोपी’ म्हटलं होतं. कृष्णवदन ब्रह्मभट्ट यांनी राहुल यांची ही टिप्पणी अत्यंत निंदनीय असल्याचं म्हटलं होतं.
ब्रह्मभट्ट म्हणाले की, 2015 मध्ये शाह यांची सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. आता राहुलविरोधातील मानहानीच्या खटल्याची सुनावणी दंडाधिकारी न्यायालयात होणार आहे.