देशातील गोदामं अन्नधान्यांनी भरलेली असताना सरकार जनतेला उपासमारीने का मारतंय? राहुल गांधींचा सवाल
जागतिक उपासमारी निर्देशांक यादीतील सुमार कामगिरीवरुन राहुल गांधींचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. धान्यांची गोदामं भरलेली असताना भारतात होणाऱ्या भूकबळीवरुन त्यानी सरकारला प्रश्न विचारला आहे.
नवी दिल्ली: जागतिक उपासमारी निर्देशांकाच्या यादीत भारत 94 क्रमांकावर असल्याच्या गोष्टीवरुन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी या प्रश्नावरुन मोदी सरकारवर टीका करताना, देशातील धान्यांची गोदामं भरलेली असताना हे सरकार जनतेला उपाशी का मारतंय, असा सवाल विचारला आहे.
देशातील काही लोकांचा विशेषत: बालकांचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचाही आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधींनी त्यांच्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "मोदींच्या धोरणामुळे भारत देशाला सातत्याने अडचणींचा सामना करावा लागतोय, खासकरुन बालकांचा उपासमारीने मृत्यू होत आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. जर देशातील धान्यांच्या गोदामात अतिरिक्त धान्यांचा साठा असेल तर मग केंद्र सरकार असे का घडू देत आहे?"
India continues to suffer from Modi-made disasters. The stories of starvation deaths, especially of children, are heartbreaking.
How can GOI allow this when the godowns are overflowing with excess food? — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 21, 2020
गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी विविध प्रश्नांवर सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत आहेत. या आधीही राहुल गांधींनी भारत उपाशी आहे कारण केंद्र सरकार त्यांच्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे, असा आरोप केंद्र सरकारवर केला होता.
काही दिवसांपूर्वी जागतिक उपासमारी निर्देशांक म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 हा अहवाल जाहीर झाला होता. त्यात 107 देशांच्या यादीत भारताचा 94 वा क्रमांक होता. विशेष म्हणजे या यादीत भारताचे शेजारी नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या शेजारी देशांची कामगिरी भारतापेक्षा सरस ठरली आहे. भारताच्या खाली फक्त 13 देशच असून त्यात आफ्रिकन अविकसित देशांचा समावेश होतो.
या वर्षीच्या जागतिक उपासमारी निर्देशांकात उपासमारीच्या प्रश्नावर भारताची स्थिती 'गंभीर' असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेषत: लहान मुलांच्या कुपोषणाचे प्रमाण खूप भयानक आहे असं त्यात म्हटलं आहे.
संबंधित बातमी