Land-For-Jobs Scam: राबडी देवींच्या निवासस्थानी CBI ची टीम दाखल; कुठल्या प्रकरणी चौकशी सुरू अद्याप अस्पष्टच
CBI Team at Rabri House: बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी आज पहाटे CBI पथक दाखल झालं आहे. ही धाड नसून फक्त चौकशीसाठी पथक दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
CBI Team at Rabri House: बिहारमधील पाटन्यात सीबीआयचं पथक दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi House) यांच्या निवासस्थानी सीबीआयची टीम दाखल झाली आहे. सीबीआय (CBI) पथक चौकशी करण्यासाठी राबडी देवी यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
सीबीआयचे 12 सदस्यांचं पथक राबडी देवी यांच्या घरी दाखल झालं आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे त्यावेळी तिथेच उपस्थित होते. मात्र बिहार विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अधिवेशनासाठी तेजस्वी यादव विधानसभेत पोहोचले आहेत. सीबीआयकडून नेमकी कोणत्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणावर राबडी देवींना यापूर्वी समन्स जारी करण्यात आलं होतं. त्यामुळे सीबीआयकडून याच प्रकरणी चौकशी केली जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसेच, राबडी देवी यांच्या निवासस्थानी कोणताही छापा टाकण्यात आला नसून केवळ चौकशीसाठी सीबीआयचं पथक दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, सोमवारी पहाटे सीबीआयचं पथक राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सहावा दिवस
बिहारमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. तेजस्वी यादव यांनाही अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत उपस्थित राहावं लागणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालं आहे. दरम्यान, आज पहाटेच राबडी देवी यांच्या निवासस्थानी CBI पथक दाखल झालं असून अशा परिस्थितीतही तेजस्वी यादव विधानसभेत पोहोचले आहेत.
प्रकरणं नेमकं काय?
लँड फॉर जॉब स्कॅम प्रकरणी जमिनीच्या बदली नोकरी देण्यात आली होती. लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि मिसा यांना राऊज एवेन्यू कोर्टातून समन्स जारी करण्यात आलं होतं. सीबीआयनं चार्जशीट दाखल केली असून याप्रकरणी राबडी देवी यांना कोर्टानं 15 मार्च रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं. पण त्यापूर्वीच सीबीआयचं पथक राबडी देवी यांच्या निवासस्थानी दाखल झालं आहे. दरम्यान, नेमकं कोणत्या प्रकरणात सीबीआयचं पथक राबडी देवी यांच्या निवासस्थानी दाखल झालं आहे, हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.
आरजेडीचा भाजपवर हल्लाबोल
ज्येष्ठ राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, भाजप केंद्रीय एजन्सींना (सीबीआय) पोपट बनवून सर्व विरोधी पक्षांसाठी त्यांचा कसा गैरवापर करत आहे? हे सर्वांना माहीत आहे. आम्ही आयटी (IT), ईडी (ED), सीबीआयला (CBI) यांना भाजपचे तीन जावई म्हणतो.