Rabindranath Tagore Birth Anniversary : देशाच्या संस्कृती, कला आणि साहित्यावर आपली छाप उमटवणाऱ्या आणि नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांची आज जयंती. रवींद्रनाथ टागोर यांना 'गितांजली' या महाकाव्यासाठी 1913 सालचा नोबेल साहित्याचा पुरस्कार मिळाला होता. ते आशियातील पहिलेच नोबेल पुरस्कार विजेते होते. रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती निमित्त जाणून घ्या त्यांची कारकीर्द. 


रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 साली कोलकात्यात एका संपन्न कुटुंबात झाला. रवींद्रनाथांनी बॅरिस्टर व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांना 1878 साली ब्रिटनला पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना पाश्चिमात्य संगीत आणि नृत्य तसेच अन्य कलांचा अविष्कार पाहायला मिळाला. त्यानंतर ते भारतात परतले. 


शास्त्रीय संगीतात योगदान : 


रवींद्रनाथ टागोर यांनी साहित्यामध्ये दोन हजारांहून अधिक रचना केल्या आहेत. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात आपलं योगदान दिलं. यापैकी 'संध्यासंगीत' हा कविता संग्रह लिहिला. तसेच प्रभात संगीत, शैशवसंगीत, छबि ओ गान अशी संगीताशी नाती सांगणारी काव्यसंग्रह आहेत. पोस्टमास्टर, चित्रा, नदी, चैताली, विदाई अभिशाप, चिरकुमार सभा, काबुलीवाला अशा अनेक साहित्यांची निर्मिती त्यांनी केली. 'जेव्हा आपण विनम्र असतो त्यावेळी आपण महानतेकडे प्रवास करत असतो' असे ते म्हणायचे.


1896 च्या डिसेंबर महिन्यात कलकत्त्याच्या काँग्रेसच्या अधिवेशनात बंकिमचंद्राच्या ‘वंदेमातरम्’ ह्या गीताला रवींद्रनाथांनी चाल दिली आणि ते गीत स्वतः म्हटले. राष्ट्रीय सभेत ‘वंदेमातरम्’ गायिले जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.


भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख घटना असलेल्या 1905 सालच्या बंगालच्या फाळणीला त्यांनी विरोध केला. 1919 सालच्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी 'नाईटहूड' ही उपाधी परत केली.  


'गितांजली' या काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार :


रवींद्रनाथ टागोरांना त्यांच्या 'गितांजली' या काव्यसंग्रहासाठी 1913 साली साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. हा भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला नोबेल पुरस्कार होता. रवींद्रनाथ टागोरांनी 'जन-गण-मन' या भारताच्या राष्ट्रगीताची रचना केली. तसेच त्यांनी 'आमार सोनार बांग्ला' या गीताची रचना केली. हे गीत बांग्लादेशचे राष्ट्रगीत आहे. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ टागोर हे जगातील एकमेव कवी आहेत. महात्मा गांधी यांना रवींद्रनाथ टागोरांबद्दल प्रचंड आदर होता. त्यांनीच टागोर यांना 'गुरूदेव' अशी उपाधी दिली होती. रवींद्रनाथ टागोरांनी 7 ऑगस्ट 1941 साली अखेरचा श्वास घेतला. 


महत्वाच्या बातम्या :