Amit Shah Meets Sourav Ganguly : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह सध्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी अमित शाह यांनी भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) यांच्या कोलकात्यामधील घरी भेट दिली. अमित शाह यांनी सौरव गांगुली यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. अमित शाह आणि सौरव गांगुली यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलेय. पश्चिम बंगालमधील निवडणूकीदरम्यान सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता या चर्चेला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. सौरव गांगुली आणि अमित शाह यांचे जेवतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. 


सौरभ गांगुली लवकरच राजकीय इनिंग सुरु करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यातच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असणाऱ्या अमित शाह यांनी सौरव गांगुली यांच्या घरी भेट दिली. यावेळी सौरभ गांगुली यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी गांगुली यांचा भाऊही उपस्थित होता. अमित साह यांनी गांगुली कुटुंबियांसोबत जेवणाचा अस्वाद घेतला. पण अमित शाह यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलेय. सौरव गांगुली राजकारणात प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. 


अमित शाह यांच्या भेटीनंतर सौरव गांगील म्हणाले की, 'ते आज संध्याकाळी घरी येणार आहेत. त्यांनी माझे आमंत्रण स्विकारले आहे. आमच्याकडे बोलायला अनेक विषय आहेत. मी त्यांना 2008 पासून ओळखतो. ज्यावेळी मी क्रिकेट खेळत होतो, तेव्हापासून त्यांच्याशी भेट होतेय. तसेच सध्या त्यांच्या मुलासोबतही काम करत आहे. आमचे जुने नाते आहे.' 






सौरभ गांगुली यांचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत देखील चांगले संबंध आहेत. सौरभ गांगुली सध्या बीसीसीआयचं अध्यक्षपद सांभाळत आहे. अमित शाह यांचे चिरंजीव जय शहा बीसीसीआयचे सचिव आहेत.